नाशिक - इतरांची कुंडली बघून भविष्यवाणी करणार्या ज्योतिष्य महिलेलाही ‘केबीसीच्या शनी’ची साडेसाती भोवली असून तिच्या कुंडलीत शिरलेल्या या शनीने तिला तब्बल दीड कोटींचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. केबीसीच्या भाऊसाहेब चव्हाण याने भविष्य सांगणार्या नाशिकरोडमधील ज्योतिष महिलेला गंडवून तिचेच ग्रह फिरवल्याची माहिती उजेडात आली आहे.
या महिलेकडे सर्वच क्षेत्रातील लोक मोठय़ा संख्येने जात असल्याचे हेरून चव्हाण 2009 मध्ये तिच्याकडे भविष्य पाहण्यासाठी गेला. याच महिलेला चव्हाण याने केबीसीच्या जाळ्यात अडकवले. ‘केबीसी’ची साडेसाती मागे लागणार याचा अंदाज या महिलेलाही आला नाही. त्यामुळे स्वत:चे घर गहाण ठेवत 30 लाखांच्या रकमेसह 140 सभासदांची एक कोटी 47 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. केबीसीमध्ये 756 भाग्याचा आकडा समजला जात होता. हा आकडा पूर्ण करणार्याला दर महिन्याला फिक्स 51 हजार रोख आणि सिंगापूर टूरचे पॅकेजच जाहीर केले होते.