नाशिक -
केबीसीमध्येसुमारे पाच लाखाहून अधिक लोकांनी पैसे गुंतवले आहेत. या लोकांची झालेली फसवणूक ही
आपत्ती असून, त्यापोटी केंद्र सरकारने विशेष मदत जाहीर करावी. अन्यथा याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसेल, असा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी दिला.
छावा, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, बळीराजा आदी संघटनांच्या एकत्रीकरणातून दादासाहेब गायकवाड सभागृहात मराठा विजय आरक्षण महोत्सव आणि केबीसी ठेवीदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर किशोर चव्हाण, अंकुशराव पाटील, सुभाष जावळे, योगेश केवारे, संजय सावंत, विजय काकडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करणार
लाखो ठेवीदारांची फसवणूक करून देशाबाहेर पळालेला केबीसीचा संस्थापक भाऊसाहेब चव्हाण यांच्या बँक खात्यातील सुमारे २९ कोटी ८६ लाख रुपये रोख रक्कम अगोदरच गोठवण्यात आली आहे. ही गोठवलेली रक्कम छोट्या गुंतवणूकदारांना देता येणार का या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करणार असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.
खासदारांच्या घरासमोर करणार आंदोलन
लाखोकेबीसी गुंतवणुकदारांची झालेली फसवणूक ही त्यांच्यावरील मोठी आपत्ती आहे. यात सर्वाधिक गुंतवणूकदार हे सामान्य शेतकरी छोटे व्यवसायिक आहेत. या सर्व गुंतवणुकदारांसाठी केंद्राने विशेष मदत जाहीर करावी, अन्यथा गुरुवारपासूनच खासदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा या मेळ्याव्या दरम्यान देण्यात आला.