आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांचा मोर्चा पुन्हा रोखला; ‘केबीसी’प्रकरणी आंदोलकांवरच कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केबीसी घोटाळ्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी बुधवारी गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चा काढला. परवानगी न घेताच मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी क्लबबाहेरच मोर्चा अडवून आंदोलकांना ताब्यात घेतले. चार दिवसांपूर्वीही पोलिसांनी अशाच प्रकारे गुंतवणूकदारांचा मोर्चा रोखत आरोपींवर लवकरात लवकर कारवाईचे आश्वासन दिले होते.
नाशिकसह राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेला केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण याला अटक करून गुंतविलेले पैसे परत द्यावेत, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यात नांदेड, परभणी, औरंगाबाद, हिंगोलीसह राज्यभरातील गुंतवणूकदार सहभागी झाले होते. मात्र शांतता भंग होण्याच्या भीतीपोटी पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नव्हती. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तब्बल पाच तास त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

पोलिस ठाण्यातही गर्दी
मोर्चात सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांना पोलिसांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले असता त्या ठिकाणी फसवणूक झालेल्यांची मोठी गर्दी झाली होती. गुंतवणूकदारांनी तेथे घोषणाबाजीही केली. सकाळी दहा वाजेपासून ताब्यात घेण्यात आलेल्या या आंदोलनकर्त्यांची दुपारी चार वाजेच्या सुमारास सुटका झाली.

तक्रारदारांच्या पावसात रांगा
केबीसी प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शोध पथकाकडे सोपविण्यात आल्याने या विभागाकडे तक्रारी देण्यासाठी बुधवारी भरपावसात अनेक गुंतवणूकदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यात बीड, जालना, नांदेड जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांचा समावेश होता. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, वडेनर भैरव या दोनच गावांतून किमान 60 ते 70 कोटींपर्यंत गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेल्या कौशल्या जगताप आणि भारती शिलेदार यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

तपासी अधिकारी अजय चांदखेडे यांनी न्यायालयाकडे या दोघींना आणखी दहा दिवस पोलिस कोठडीची मागणी केली. परंतु, सहा दिवस झाल्याने पोलिस कोठडी नाकारण्यात आली. तक्रार दाखल करण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराला 10 ते 20 मिनिटांचा कालावधी लागल्याने कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. भरपावसात गुंतवणूकदारांना बाहेरच उभे राहवे लागल्याने त्यांची गैरसोय झाली.

बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या हजारोंच्या संख्येत असून त्यांना नाशिक येथे तक्रार दाखल करण्यासाठी आठ ते दहा तासाचा प्रवास करून यावा लागतो. त्यामुळे जिल्हास्तरावरच अथवा औरंगाबाद येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करून तक्रारी स्वीकाराव्यात, अशी मागणी बीडचे राज आव्हाड यांनी केली.

मालक होण्याचे स्वप्न अधुरेच...!
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात एका पेट्रोल पंपावर काम करणारा युवक भाऊसाहेब चव्हाण याच्या संपर्कात आला. त्याने श्रीमंतीचे आमिष दाखविले. त्याला हा युवक बळी पडला. वर्षभरातच 100हून अधिक सभासद जमवले. तीन वर्षांत कोट्यवधींच्या ठेवी जमा केल्या. कमिशनच्या जोरावर नवीन पेट्रोल पंप टाकण्याच्या तयारीत होता. गावातच 50 लाखांचा बंगला, स्कॉर्पिओ खरेदी केली. अंगावर सोन्याचे लॉकेट, हातात ब्रेसलेट घालून फिरणार्‍या या युवकास 24 मार्च 2014 नंतर मात्र गुंतवणूकादारांच्या ठेवीचा परतावा न मिळाल्याने तो अडचणीत आला.
गुंतवणूकदारांचा संयम सुटत चालला असून अल्पावधीत श्रीमंत झालेल्या युवकास हीच मालमत्ता विकावी लागणार असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.