आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal News In Marathi, Kejriwal Vist To Nashik

केजरीवाल येणार नाशिकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राष्ट्रवादीचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांच्याशी दोन हात करण्याकरिता तसेच, शिवसेना-मनसेच्या बालेकिल्ल्यात ‘आम आदमी’ची हवा निर्माण करण्यासाठी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नाशिकच्या निवडणूक रणांगणात 12 एप्रिलला उतरणार आहेत. गोल्फ क्लब येथे त्यांची जाहीर सभा जवळपास निश्चित झाली आहे.

आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम नाशिकची जागा निश्चित झाली होती. नाशिकस्थित मेटाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांची निवृत्तीपूर्वीच आम आदमी पक्षाकडून उमेदवारी अंतिम झाली होती. पांढरे यांनी सिंचन घोटाळ्यावरून कॉँग्रेस आघाडीचे पितळ उघडे पाडल्यामुळे आम आदमीला त्यांचा फायदा होईल, असा अंदाज होता. त्यानुसार निवृत्तीनंतर पांढरे यांचा पक्षप्रवेश झाला व नाशिक लोकसभा मतदारसंघातील लढतीसाठी राजकीय पक्षांच्या स्पर्धेत सर्वप्रथम त्यांचीच उमेदवारी जाहीर झाली.
उमेदवारी जाहीर झाल्यावर पांढरे यांनी भुजबळ स्कॅमसारख्या पुस्तिका काढून विकासातील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचाराच्या पातळीवर हाती घेतला. त्यानुसार केवळ आणि केवळ राष्ट्रवादीलाच लक्ष्यही करणे सुरू झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत आम आदमीकडून तेच तेच आरोप होत असल्यामुळे प्रतिसाद कमी होत आहे. अशा आरोपांना कार्यकर्तेही कंटाळले असून, दुसरीकडे पक्षाकडे प्रभावी ठरेल किंबहुना राजकीय हवापालट करू शकेल, अशा मुद्याचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता एप्रिलमध्ये केजरीवाल यांची सभा घेण्याची रणनीती आखली जात आहे. त्यासाठी प्रथम 10 एप्रिलची तारीख निश्चित झाली होती. मात्र, आता 12 एप्रिलचा विचार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नाशिकरोबरच पुणे व औरंगाबाद येथेही त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महाराष्ट्रात मुंबई व नागपूरमध्ये प्रचारफेरी करून केजरीवाल यांनी वातावरण निर्मिती केली होती.
धडपड स्टार चेहर्‍यांसाठी
आम आदमीकडे वातावरण निर्मिती करण्याकरिता स्थानिक पातळीवर भारदस्त नेत्यांची फळी नाही. केवळ कार्यकर्तेच हीच एक जमेची बाजू आहे. त्यामुळे दिल्ली निवडणुकीत स्टार ठरलेल्या नेत्यांच्या सभांचे नियोजन होत आहे. त्यात कुमार विश्वास, योगेंद्र यादव, अंजली दमानिया यांच्याही सभा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आर्थिक कसरतीचा सामना
दरम्यान, अन्य उमेदवारांबरोबरच आपकडून प्रचाराला सुरूवात झाली असून, डोअर टू डोअर प्रचारावरच भर दिला जात आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात दौरे सुरू असून, अर्थिक मदतीच्या आवाहनालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना पदरमोड करून फिरस्ती करावी लागत आहे.