आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूत्रविकारांत संशोधन व्हावे- कुलगुरू डॉ. अरुण जामकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- केवळ मूत्रविकारांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा करण्यासाठी असलेली ही परिषद आहे. मूत्रविकारांशी संबंधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या विकारांत संशोधन होणे आवश्यक आहे. या संशोधनासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी शनिवारी येथे केले.
अण्णासाहेब चुडामण पाटील मेडिकल फाउंडेशन येथे आयोजित स्टोनकॉन-2012 या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. भाईदास पाटील आणि मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. जामकर यांनी सांगितले की, मूत्रविकारांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी स्टोनकॉन एक योग्य व्यासपीठ आहे. मूत्रविकारांसाठी अनेक आयुर्वेदिक तसेच अ‍ॅलोपॅथिक औषधींशिवाय काही खास उपचारही आहेत. ज्याचा समाजातील व्यक्ती वापर करतात; परंतु बदलत्या परिस्थितीत या औषधांची वैधता तपासण्याची गरज आहे. इतकेच नव्हे, तर त्यात संशोधन करणेही आवश्यक आहे. मुतखडा झाल्यानंतर केल्या जाणाºया उपचारापेक्षा मुतखडा होऊच नये यासाठी योग्य ते संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठही संशोधनाला चालना देत असते. दोन दिवस सुरू असणाºया स्टोनकॉन-2012 या परिषदेत शनिवारी धुळे जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रातून 200हून अधिक डॉक्टर उपस्थित होते. यात विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय होती. दरम्यान 15 जुलै रोजी मूत्रविकारांशी संबंधित विविध रोगांवर चर्चा तसेच शस्त्रक्रियांविषयी माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, या परिषदेत विद्यार्थ्यांना युरोलॉजीशी संबधित तंत्रज्ञान अवघड शस्त्रक्रिया आदींची माहिती पॉवरपॉइंटच्या माध्यमातून दिली जाणार आहे. परिसंवादात डॉक्टरांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विविध शस्त्रक्रियांची माहिती- दरम्यान, स्टोनकॉन-2012 या परिषदेत मूत्रविकार तसेच मुतखड्याशी संबंधित विविध प्रकारचे नवीन शोध व शस्त्रक्रियेविषयी उपस्थित डॉक्टरांनी प्रेझेंटेशन सादर केले. यात डॉ. सुबोध शिवदे, डॉ. वासुदेव रिधोरकर, डॉ. ग्यानेंद्र शर्मा, डॉ. हेमेंद्र शहा, डॉ. आशिष पाटील, डॉ. अतुल सोनी, डॉ. उल्हास साठ्ये, डॉ. जयेश दाबलिया आदी डॉक्टरांनी आपले प्रेझेंटेशन सादर केले. या वेळी विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर शंका उपस्थित करीत नवीन माहिती मिळवली.