आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. आर आबा... जनसामान्यांसाठी तळमळणारा नेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरिबांविषयी आपुलकी, तळमळ असलेले आर. आर. पाटील ऊर्फ आबा हे अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठीच काम करीत राहिले. त्यांच्याकडे तक्रारी, गाऱ्हाणं घेऊन येणाऱ्यांना दिलासा देताना त्याच्या कामाची तड लागेपर्यंत आबा शांत बसायचे नाहीत. त्यांच्या या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...

‘आबा गेले' या बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही. मात्र, दुर्दैवाने ही बातमी अखेर खरी ठरली. त्यांच्या असंख्य आठवणींनी मनात काहूर केले. खूप अस्वस्थ वाटतं. आबा गृहमंत्री असताना त्यांचा आणि माझा संबंध आला. मी तेव्हा मंत्रालयात विभागीय संपर्क अधिकारी होतो. नेहमीचे कार्यक्रम, शासकीय बैठकांमुळे त्यांच्याशी ओळख झाली. मी त्यादिवशी सुटीवर होतो, तो ३१ डिसेंबर २०१० होता, माझा मुलगा तेजसचा जन्म झाला, त्या दिवसाची गोष्ट... सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आबांनी फोन केला, ‘मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन केले, उद्या-परवापासून माझ्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून कामाला सुरुवात करा’, असा प्रेमळ आदेश दिला. केवळ काही दिवसांच्या ओळखीतून माझे आणि आबांचे ऋणानुबंध जुळत गेले.
दरम्यान, सर्व कार्यालयीन सोपस्कार पार पाडल्यानंतर मी जानेवारी २०११ मध्ये आबांकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झालो. सप्टेंबर २०१४ पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो.
या काळात मला जे आबा दिसले त्यातून ते आयुष्यभरासाठी मनावर कोरले गेले. मंत्रालयाला २१ जून २०१२ ला लागलेल्या आगीच्या वेळी मी जखमी झालो असताना रोज सकाळ-संध्याकाळ आबा फोनवरून आपुलकीने विचारणा करायचे. डॉक्टरांशी बोलायचे, मंत्रिपदाचा बडेजाव बाजूला सारून नाशिकला घरी आलेल्या आबांनी कुटुंबीयांबरोबर वेळ घालवला.
लहानग्या तेजसला मांडीवर घेऊन त्याच्याशी बोबड्या शब्दात बोलणारे आबा आज खूप आठवतात. गरिबांविषयी आपुलकी, तळमळ असलेला हा नेता अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठीच काम करीत राहिला. गृहमंत्री म्हणून काम करीत असताना आबा अहोरात्र व्यस्त असायचे, रात्री कधीही फोन वाजला की तो आबांचाच राहायचा. आबा कधीही चिडलेले, संतापलेले पाहिले नाही. आपण एका परिवारातील सदस्य आहोत आणि जनसेवेची मोठी संधी मिळाली आहे त्यासाठी एकत्रित काम करूया असं ते नेहमीच सांगायचे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात नेहमीच सहभागी असलेल्या आबांमुळे मी माझ्या आयुष्यात वाढदिवसाला पहिल्यांदा केक कापला.
आबांची दिनचर्या अतिशय व्यस्त असे. पहाटे साडेपाच-सहा वाजता सुरू झालेला त्यांचा दिवस मध्यरात्री दोन-अडीच वाजता संपायचा. राजकीय जीवनचरित्रे, मान्यवरांची भाषणे ऐतिहासिक संदर्भ वाचायला त्यांना खूप आवडायची. वाचताना त्यात काही विशेष आढळलं की, लगेच रात्री-मध्यरात्री फोन करून ते मला सांगायचे ‘मी हे पुस्तक वाचतोय, उद्या तुमच्याकडे हे पाठवतो, तुम्हीदेखील वाचा' स्वतःचे संदर्भ स्वतः काढणारा हा नेता कधीही लिहिलेल्या भाषणांवर विसंबून राहिला नाही. स्वतःची अफाट शब्दसंपदा आणि संदर्भ निर्माण केलेल्या आबांचे निवासस्थानातील कार्यालय एखाद्या ग्रंथ भांडाराला लाजवेल इतकी पुस्तके, ग्रंथांनी भरलेले होते.

मंत्री आस्थापनेहून मूळ विभागात रुजू झाल्यानंतरही आबांशी माझे बोलणे व्हायचे. नोव्हेंबरमध्ये आबांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. एक दिवस त्यांचे पोलिस निरीक्षक असलेले बंधू राजू तात्यांचा फोन आला त्यांनी तो आबांना दिला. आबांचा पहिला प्रश्न ‘कुठे आहे?' ऐकल्यावर गहिवरून आले, आबा तुम्ही कसे आहात? विचारल्यावर ते म्हणाले, मी बरा आहे. तुमचं काय चाललं? असं उलट आपलीच खुशाली विचारणाऱ्या आबांचे शब्द आज जेव्हा आठवतात तेव्हा खूप गहिवरून येते.
आबांच्या निधनाने माझी व्यक्तिगत खूप हानी झाली आहे, मी, माझ्या परिवाराने आबांसारखा मार्गदर्शक, मोठ्या भावाचं प्रेम देणारा, लोकनेता आज गमावला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

( लेखकतत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी होते.)
किशोर गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापताना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील.