आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजा धाग्याचा जीवघेणा खेळ; अनेक जणांवर ओढवले प्राणांतिक संकट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकरसंक्रांत म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या काळात पतंग उडवण्याची परंपरा आहे. आता हीच परंपरा काही कारणांमुळे जीवघेणी ठरत आहे. केवळ वर्चस्वाच्या लढाईमुळे नायलॉन आणि चिनी मांजावर बंदी असूनही याचा सर्रास वापर केला जात आहे. यामुळे स्वच्छंदपणे भरारी घेणार्‍या पक्ष्यांनाही जीव गमवावा लागत असून, यंदा संक्रांतीला केवळ नायलॉन धाग्यामुळे दोनशेच्या वर पक्षी जखमी झाले, तर शहरात गाडीवर, पायी चालणार्‍यांचा जीव बालंबाल बचावला आहे. पोलिसांनी घातलेल्या बंदीनंतरही मांजाचा राजरोसपणे वापर केला जात असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सार्‍यांचाच जीव टांगणीला लागला आहे. यावर डीबीस्टारने टाकलेला प्रकाशझोत..

नायलॉन व चिनी मांजावर ग्रामीण भागात बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी, तर शहरात पोलिस आयुक्तांनी दिले होते. मात्र नागरिकांची वाढती मागणी पाहता विक्रेत्यांनीही या कालावधीत जोरदार कमाई केली. संक्रांतीच्या चार दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्तांनी अशा मांजावर बंदी घालण्याचे आदेश काढल्याने विक्रेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मालाची खरेदी करण्यापूर्वीच विक्रेत्यांना पोलिसांनी याची कल्पना द्यायला हवी होती, असे त्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांच्या आदेशाला हरताळ
शहरात पोलिस उपआयुक्त संदीप दिवाण यांनी नायलॉन व चिनी मांजा विक्रीला 20 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. मात्र, पोलिसांच्या आदेशाला विक्रेत्यांनी हरताळ फासल्याने शहरात सुमारे 200 पक्षी जखमी झाले. काही नागरिकांच्याही डोळ्याला, गळ्याला जखमा झाल्या असून; एका महिलेच्या पायात मांजा अडल्याने ती गाडीवरून खाली पडल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांनी मांजा विक्रीबंदीनंतर 20 विक्रेते खुलेआम मांजाची विक्री करीत असताना पोलिसांनी त्यांच्यावर तक्रारी दाखल केल्या आहेत.

मांजा बनवण्याची प्रक्रिया किती घातक
मांजा तयार करण्यासाठी डिंक किंवा चिकटणारे कोणतेही पदार्थ आणि काचेच्या पावडरचे मिर्शण तयार केले जाते. यात मैदा टाकून मिर्शण आणखी घट्ट केले जाते. दोर्‍यावर या मिर्शणाचा थर दिला जातो. काच दबला जाऊ नये यासाठी मिर्शण लावताना सतत हलवले जाते. काचेमुळे दोरा आणखी खरखरीत होतो. काही ठिकाणी वज्रम नावाचे इंडस्ट्रियल अँडहेसिव्हसुद्धा मिर्शणात टाकले जाते.

या अँडहेसिव्हमध्ये अँल्युमिनियम ऑक्साइड आणि झिरकोनिया अँल्युमिनासारखी खरखरीत रसायने असतात. अशा प्रकारच्या अँडहेसिव्हचा प्रयोग तामिळनाडूमध्ये सर्रास केला जातो. यामुळे दोर्‍याची धार आणखी वाढते. पण आता पॉलीप्रॉपिलीनपासून बनवलेला चायनीज मांजा आला आहे. हा आणखी धोकादायक आहे. पारदर्शक असल्यास तो दिसत नाही. जिथे अँल्युमिनियम ऑक्साइड आणि झिरकोनियासारखे पदार्थ दोर्‍याला इंसुलेट करतात. म्हणजे त्यातून वीज प्रवाहित होण्याची शक्यता कमी होते.

पण पॉलिप्रॉपिलीन हा पदार्थ अत्यंत घातक आहे. हा दोरा विजेच्या तारेला लागला तर पतंग उडविणार्‍याला धक्का लागू शकतो. पॉलिप्रॉपिलीन खूप काळ वातावरणाच्या संपर्कात येऊन आरोग्याला धोकादायक अशा घटकांमध्ये तुटतो, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात आढळले आहे.


थेट प्रश्न- संदीप दिवाण, पोलिस उपआयुक्त

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर काय कारवाई?
शहरातील पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी संक्रांत काळात पतंग उडविणार्‍यांकडून नायलॉन मांजा वापराने पशुपक्षी व वाहनचालकांच्या जीविताला धोका पोहचतो. त्यामुळे मांजाविक्रीवर, निर्मितीवर बंदीची मागणी केली. त्यानुसार तत्काळ पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम 144(1) (2) अन्वये कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले होते. यामध्ये नायलॉन मांजा विक्री, मांजा निर्मिती करणार्‍यांविरुद्ध कारवाई हाती घेण्यात आली.

किती विक्रेत्यांवर कारवाई?
संक्रांतीच्या दोन दिवस अगोदर आदेश प्रसिद्ध करण्यात आले असल्याने कारवाईला फारसा वेळ मिळाला नाही. तरी गंगापूररोड, रविवार कारंजा, मेनरोड परिसरात जवळपास 25 विक्रेत्यांना ताब्यात घेतले. माल ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कारवाईबाबत पोलिसांना मर्यादा पडतात का?
पर्यावरणाला धोका व अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून फौजदारी संहिता प्रक्रियेनुसार आदेश प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, मांजा उत्पादनाची ठिकाणे परराज्यात व परजिल्ह्यात असल्याने आणि त्याची वाहतूक रोखणे, त्यांचे गुदाम तपासणीचे अधिकार पोलिस यंत्रणेला नाही. त्यामुळे कारवाईवर मर्यादा पडतात.

नेमकी काय कारवाई अपेक्षित आहे?
नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी व पशु-पक्ष्यांचे जीव वाचवण्यासाठी उत्पादनावरच बंदी घातली पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. लहान मुलांपासून ते मोठय़ांपर्यंत मांजाचे दुष्परिणाम सांगितले पाहिजेत.