आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांचा झाला खेळ, पण त्यांचा गेला जीव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पतंगांच्या खेळाला उधाण आलेले असतानाच दुसरीकडे दोनशेहून अधिक पक्ष्यांच्या मुळावरच हा खेळ उठल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या खेळाला आवर घालत परंपरा पाळण्यासाठी केवळ संक्रांतीच्या दिवसापुरता तो र्मयादित ठेवून पक्ष्यांची आणखी हानी टाळण्याचे आवाहन पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींनी केले आहे.

संक्रांतीच्या एका दिवसातच जायबंदी झालेल्या व दगावलेल्या पक्ष्यांची संख्या दोनश्ेाहून अधिक असल्याचे पक्षीप्रेमींचे मत आहे. काटाकाटीत ‘खेळाडूं’चा चार-पाच रुपयांचा पतंग जातो. मात्र, त्या खेळात एखाद्या पाखराचे पंख, पाय, मान कापली जाते. असे पाखरू परतू शकत नाही, तेव्हा घरट्यात वाट पाहणारी त्याची पिले जीव सोडतात. या हानीची गणतीच होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. महानगरात केवळ संक्रांतीच्या दिवशी जायबंदी वा मृत पक्ष्यांमध्ये कबुतर, साळुंकी, घार, कावळा, घुबड, बगळा, करकोचा आदींचा समावेश आहे. जखमी झाल्यावर पक्षीप्रेमी किंवा डॉक्टरांकडे नेण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने तडफडून जागीच जीव गेलेल्या पक्ष्यांचे प्रमाण मोठे असण्याची शक्यता आहे.

नायलॉन म्हणजे मृत्यूचा सापळाच
नायलॉनचा मांजा तर मृत्यूचा सापळाच असल्याने त्याच्यावर स्वयंप्रेरणेने बंदी घातली पाहिजे. वाहन अपघात, पक्षी जखमी वा मृत होणे याचे सर्वाधिक प्रमाण केवळ नायलॉन मांजामुळेच होत आहे. गेल्या तीन दिवसांत माझ्याकडेच 15 हून अधिक जखमी पक्षी उपचारासाठी आले. गंभीर पक्ष्यांना जिल्हा पशुचिकित्सालयात पाठवले. इतरांवर मी उपचार केले.
-चंद्रकांत दुसाने, पक्षीमित्र, पंचवटी

जीवघेणा मांजा
हा धागा वर्षभर टिकतो. त्यातून घडणार्‍या दुर्घटना पुढील वर्षभर होत राहतात. पक्ष्यांना आणि माणसांना सर्वाधिक हानी पोहोचवणार्‍या नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी घालावी.
-निखिल पंडित, पक्षीप्रेमी, महात्मानगर

माझ्यासमोर दोन पक्षी गतप्राण
नायलॉन मांजामुळे जखमी पारवा व वटवाघळाने माझ्यासमोर जीव सोडला. या मांजाचा गुंता लवकर सुटत नाही. वाचण्यासाठीची धडपड निष्फळच ठरते. - -अभिजित महाले, पक्षीप्रेमी, अंबड