आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी अत्याचारप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल, ७० साक्षीदार आणि ३९ पुरावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील शालेय अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व हत्याप्रकरणी घटनेला ८५ दिवस उलटून गेल्यानंतर तीन आरोपींच्या विरोधात तीनशे पानांचे दोषारोपपत्र शुक्रवारी दुपारी दाखल करण्यात आले. पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर हे आरोपपत्र दाखल केले असून हा खटला ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम लढवतील. दोषारोपपत्रात जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरक्ष भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध अमानुष अत्याचार, हत्या व बाल लैंगिक अत्याचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

एकूण ७० साक्षीदार : पोलिस निरीक्षक शशिराज पोटोळे यांच्या पथकाने हा तपास केला. परिस्थितीजन्य, सबळ पुरावे व प्रत्यक्षदर्शी असे एकूण ७० साक्षीदार यात आहेत. एकूण ३९ प्रकारचा मुद्देमाल पकडल्याचे नमूद आहे.

आरोपींवर बाल लैंगिक अत्याचारासह हत्येचे कलम
पीडित मुलीला ठार मारल्यामुळे कलम ३०२, अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी कलम ३७६ (अ), कलम ४ व ६, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (पोक्सो) कलम आरोपींवर लावण्यात आले आहे. यात आणखी आरोपी अाढळल्यास १७३ (८) प्रमाणे त्यांचे जबाब घेऊन त्यांना आरोपी करण्यात येणार आहे.

असा घडला गुन्हा
या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने १३ जुलै रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कोपर्डीतील शालेय मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारले. त्यास १५ जुलै रोजी श्रीगोंदे येथून अटक करण्यात आली. या घटनेत एकच आराेपी असावा असा पोलिसांचा प्रारंभी कयास होता. त्यामुळे शिंदे याचे साथीदार संतोष व नितीन दुर्लक्षित राहिले होते.

विलंब का...?
संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणी जवळपास तीन महिन्यांनी आरोपपत्र दाखल झाले. हा विलंब का, ही बाब आजही गुलदस्त्यात आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून काही अहवाल आले नसल्याचे पोलिस खासगीत सांगत होते. दोन दिवसांपूर्वी ‘दिव्य मराठी’ने हे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तातडीने आरोपपत्र दाखल झाले.

आरोपींना फाशी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
सरकारने उज्ज्वल निकम यांच्यासारखे वकील दिले आहेत. आम्ही या नराधमांना फाशी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काही लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी या प्रकरणी आंदोलनाची भाषा करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोलीत बोलताना केला.

ग्रामस्थांमुळे आणखी दोघे सापडले...
या प्रकरणात शिंदेला अटक झाल्यानंतर तो एकटाच नव्हे, एकूण तीन आरोपी आहेत, असा ग्रामस्थांचा दावा होता. इतर दोघांच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी दबाव वाढवल्यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी नितीन भैलुमे यास १६ जुलै, तर तिसरा आरोपी संतोष मवाळ यास १७ जुलैला अटक केली. दरम्यानच्या कालावधीत या प्रकरणाला जातीय रंग येऊ लागल्याने गांभीर्य वाढले. राज्यातील प्रमुख नेत्यांनी कोपर्डीला भेट देऊन वातावरणत तापले. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दाखल केले असता त्यांच्यावर अंडी व चपला फेकण्यात आल्या. त्यामुळे आरोपींच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर झाला. आरोपपत्र दाखल करण्यास होत असलेल्या विलंबामुळे मराठा समाज राज्यभर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर झाले होते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, राज्याला हदरवून सोडणाऱ्या अत्याचाराचा घटनाक्रम
बातम्या आणखी आहेत...