आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumakar Ketakr Speaking At Kakasaheb Wagh Mimorial Lecture Series

नकारात्मक मतदानामुळे अस्थिर सरकारे,‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सर्मथनार्थ मतदानाऐवजी ते नकारात्मकतेतून होत असेल आणि राजकीय असंतोष मतदानाचा पाया असेल तर त्यानंतर येणारे सरकार हे अल्पवधीचेच ठरते, असा आजवरचा इतिहास सांगतो. नरेंद्र मोदी अथवा ‘आप’ यांना मिळणारा जनाधार राजकीय असंतोषातून निर्माण झाला आहे. त्याद्वारे या पक्षांकडे सत्ता येईलही; परंतु कदाचित ही बाब निवडणुकीला लगेचच सामोरे जाण्याची नांदी असेल, असे स्पष्ट मत ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले. 2014 ते 2019 या कालावधीत आपण कोणते धोरण अवलंबणार आहोत, यावर 2014च्या निवडणुकीचा कल ठरावा, अशीही अपेक्षा त्यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या 115व्या जयंतीनिमित्त क. का. वाघ शिक्षण संस्थेतर्फे शंकराचार्य संकुलात ‘2014 मधील भारतापुढील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ होते. प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, काशिनाथ टर्ले उपस्थित होते. प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

मोदींना मिळणारा प्रतिसाद कॉँग्रेसप्रती नकारात्मकतेचे द्योतक आहे. ‘आप’च्या रूपाने नकारात्मकतेचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यातूनच मोदींकडचा प्रवाह आपच्या दिशेने वळाला आहे. या पार्श्वभूमीवर 2014ची निवडणूक आतापर्यंतची सर्वात वेगळी, अराजक माजवणारी आणि दिशाहीन असण्याची शक्यताही केतकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंगेश पाटील या गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. प्रा. मिलिंद मुरुगकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राजक्ता विसपुते व स्वाती पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनायक शेवतेकर यांनी आभार मानले.

ओबामांचे उदाहरण
2008मध्ये ओबामा निवडून येतील, याचा अंदाज न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टव्यतिरिक्त कोणीही केला नव्हता. त्यावेळी तेथे वित्तीय संस्था ज्या वेगात कोसळल्या आणि या घटनेची तुलना 1929 च्या महामंदीशी झाली, तेव्हा या स्थितीतून अमेरिकेला बाहेर काढण्याचे काम ओबामा करतील, या अपेक्षेतून त्यांना निवडून दिले. चार वर्षांत अपेक्षित सुधारणा न झाल्याने सत्तापरिवर्तन अपेक्षित असताना ओबामाच निवडून आले. आगामी लोकसभा निवडणूक साधारणत: याच काळाला अनुषंगून होत आहे.