आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुबत्तेतून आलेल्या अर्थसंकटाची भीती नको - कुमार केतकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - 1991च्या तुलनेत आजचे आर्थिक संकट वेगळे असून, ते आर्थिक दुर्बलतेतून नाही, तर सुबत्तेतून आलेले असल्याने भारतीयांनी घाबरून जाण्याची गरज नाही. भारताकडे 35 कोटीची मध्यमवर्गीयांची बाजारपेठ आहे. त्याचबरोबर शिक्षणातून आलेली बौद्धिक संपदा व भांडवल गुंतवणुकीतून मिळणारा तीन टक्क्यांपेक्षा जास्त परतावा बलस्थाने असून, भवितव्य उज्ज्वल असल्याने निराश होण्याचे कारण नसल्याचे प्रतिपादन ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

स्व. बाबूभाई राठी स्मृतिदिनानिमित्त निमा हाउस येथे ‘उद्योग जगतासमोरील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, बाळाकाका राठी, आयमाचे अध्यक्ष सुरेश माळी, नाइसचे उपाध्यक्ष संजीव नारंग, निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, र्शीकांत बच्छाव होते.

आजचे आर्थिक अरिष्ट 1991च्या तुलनेत पूर्णत: वेगळे आहे. त्यावेळी देशाला 20 टन सोने गहाण ठेवून पुढील कर्ज मिळावे याकरिता बॅँकांच्या कर्जाचे हप्ते भरावे लागले होते. आज उलट स्थिती आहे. आर्थिक संकट असले तरी मॉल, सराफी पेढय़ांत किंवा पिझ्झाच्या दुकानांतील गर्दी कमी झालेली नाही. मध्यमवर्गाच्या हाती सहाव्या वेतन आयोगानुसार मुबलक पैसा आल्यानेच हे चित्र आहे. आर्थिक संकटाचा विचार करता यूपीएचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे वाटत नसून किमान तीन वर्षे आर्थिक संकटाची हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे; मात्र येत्या सहा-आठ वर्षांत वेगाने विकास दर वाढेल, असे केतकर यांनी सांगितले.

यामुळे उद्भवले आर्थिक संकट
2008मध्ये लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर अमेरिकेत जी आर्थिक स्थिती बिघडली तिचा परिणाम जागतिक मंदीत झाला. तेथील बॅँकांनी बेजबाबदार कर्ज वाटले आणि त्याची वसुली न झाल्याने ही मंदी आली. त्यानंतर अमेरिकन सरकारने बॅँकांचे राष्ट्रीयीकरण केले. वाईट स्थिती पाहून तेथील गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात मोठी गुंतवणूक केली आणि अमेरिकेची आर्थिक स्थिती 2013 मध्ये सुदृढ होत असल्याचे दिसताच त्यांनी गुंतवणूक परत नेल्याने आजची स्थिती निर्माण झाल्याचे केतकर यांनी स्पष्ट केले.

स्व. बाबूभाई राठी यांच्या प्रतिमेचे अनावरण
औद्योगिक क्रांती नाशिकमध्ये आणणार्‍या स्व. बाबूभाई राठी यांच्या प्रतिमेचे अनावरण निमा हाउस येथे केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नाइसचे अध्यक्ष विक्रम सारडा, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, प्रकाश ब्राrाणकर, राजेंद्र अहिरे, मृदुला जाधव, विवेक पाटील, नीलिमा पाटील, किशोर राठी, आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, क्रेडाईचे राज्य सहसचिव सुनील भायभंग यांसह उद्योजक व राठी परिवार उपस्थित होता.