आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ ‘पूर्वपरीक्षे’त प्रशासन अनुत्तीर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी अंदाजे किती साधू आणि भाविक येतील?’ या मुख्य सचिवांच्या प्रश्नावर शुक्रवारी महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारीदेखील निरुत्तर झाले. त्यामुळे अवघ्या दोन वर्षांवर आलेल्या सिंहस्थासाठी प्रशासनाची तयारी कोणत्या पातळीवर आहे हेच दिसून आल्याची प्रतिक्रिया साधू-महंतांसह नागरिकांनी व्यक्त केली.

राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी रामकुंड, तपोवन आणि साधुग्रामचा पाहणी दौरा केला. त्यांच्यासमवेत राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ हेही होते. यावेळी नियोजनासंदर्भात सूचना करतानाच त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. साधू-भाविकांसह कुंभमेळ्यासाठी नेमके किती लोक येतील, याबद्दलची त्यांची जिज्ञासा अधिकारी पूर्ण करू शकले नाहीत. महंत सुधीरदास पुजारी यांनी अंदाजे दोन लाख साधू येण्याची शक्यता व्यक्त केली. तपोवन परिसरातील झोपडपट्टीबद्दल त्यांनी पृच्छा केली असता अधिकार्‍यांनी ती अनधिकृत असल्याचे सांगितले.

कुंभमेळा नियोजनाची माहिती घेण्यासाठी बांठिया प्रथमच नाशिकमध्ये आले होते. सकाळी दहाच्या सुमारास रामकुंडापासून सुरुवात करून नंतर त्यांनी जुना शाहीमार्ग, साधुग्राम आणि तपोवनातील आखाड्यांसह प्रस्तावित नवीन शाही मार्गाची पाहणी केली. शाहीमार्गावरील अतिक्रमित इमारतींचीदेखील त्यांनी पाहणी केली. साधू-भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेता रस्ते खूपच अरुंद असल्याचे मत त्यांनी दयाळ यांच्यासमवेतच्या चर्चेत व्यक्त केले. त्यावर आतापासूनच उपाययोजना करण्याचे आदेश पोलिस अधिकार्‍यांना दयाळ यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम सचिव शामकुमार मुखर्जी, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, जिल्हाधिकारी विलास पाटील, पालिका आयुक्त संजय खंदारे, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, शहर अभियंता सुनील खुने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.