आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी सिंहस्थाची : उड्डाणपुलाचे विस्तारीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - नाशिकमध्ये भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याला देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. अशा वेळी अलाहाबाद कुंभमेळ्यात झालेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड स्थानकावरील ऐतिहासिक उड्डाणपुलाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेगाडी आल्यानंतर स्थानकावर, स्थानकात येताना व बाहेर पडताना प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन तिकीट बुकिंग कार्यालयाजवळील पुलाचा थेट स्थानकाच्या बाहेरपर्यंत विस्तार केला जाणार आहे.

एकाच वेळी दोन्ही बाजूंच्या प्रवाशांची पुलावरील होणारी गर्दी टाळण्यासाठी विस्तारित पुलावर पार्टिशन टाकून येणार्‍या-जाणार्‍यांसाठी दोन स्वतंत्र मार्ग तयार करण्यात येतील. स्थानकावर तीन फलाट असून, हा पूल तिन्ही फलाटांना जोडलेला आहे. एक क्रमांकाच्या फलाटावरून चढलेला प्रवासी दोन, तीन क्रमांकाच्या फलाटावर उतरतो, तसेच तीन क्रमांकाच्या फलाटावरून चढलेला प्रवासी एक क्रमांकाच्या फलाटावर उतरतो. त्यामुळे फलाट क्रमांक एकवर गाडीची वाट बघणार्‍या आणि पुलावरून उतरणार्‍या प्रवाशांमुळे फलाटावर गर्दी होते. या गर्दीचा ताण पडून अनुचित घटनेच्या शक्यतेमुळे प्रवासी संघटनेच्या मागणीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विस्तारीकरणानंतर पुलाचे प्रवेशद्वार आरक्षण कार्यालयाबाहेर स्थानक आवारात राहील. बाहेरून येणारा प्रवासी बाहेरूनच पुलावर चढून कोणत्याही फलाटावर उतरू शकेल, तर फलाटावरून चढलेला प्रवाशी स्थानकाबाहेर पडू शकेल.

150 वर्षांपूर्वी उभारलेला पूल : सुमारे 150 वर्षांपूर्वी या पुलाची उभारणी करण्यात आली होती. या पुलाची दुरवस्था झाली आहे. दरम्यानच्या काळात पुलावर ताण पडून पूल कोसळण्याच्या भीतीने पुलाखालील स्टॉल्स हटविण्यात आले होते. सन 2014-15 मध्ये होणार्‍या कुंभमेळ्याला अडीच कोटी भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज रेल्वे प्रशासनाने बांधला आहे.

निजामुद्दिन एक्स्प्रेसच्या पुढील आठवड्यात चार फेर्‍या
अतिजलद लोकमान्य टिळक टर्मिनस ते निजामुद्दिन एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत नसल्याने ही गाडी बंद करण्याची स्थिती निर्माण झाली असताना, मध्य रेल्वे प्रशासनाने अनपेक्षितपणे पुढच्या आठवड्यात या गाडीच्या दोन फेर्‍या मारण्याचा निर्णय घेतला आहे. 15 व 22 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निजामुद्दिनकडे, तर 16 व 23 रोजी निजामुद्दिनवरून परतीची फेरी मारणार आहे.