आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्रामसाठी इमारतींचेही अधिग्रहण होण्याचे संकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - साधुग्रामसाठी प्रशासनाने 54 एकर जागा संपादित केली असून आणखी 298 एकरांचे अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तेथील इमारतीही अधिग्रहित करण्याचे संकेत त्यांनी दिले; मात्र अधिग्रहण कधी होईल हे स्पष्ट न केल्याने अधिग्रहणाचे घोंगडे भिजतच पडणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कुंभमेळ्यासाठी 2060 कोटींचा प्रस्ताव मिळाला असून राज्य व केंद्र सरकारकडून निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समिती स्थापन केली असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती व पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती काम करणार आहे. पायाभूत सुविधा व कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला असल्याचे बांठिया यांनी सांगितले. जूनपासून प्रत्यक्ष विकास कामाच्या निविदा काढल्या तरच दीड वर्षात सर्व कामे पूर्ण होऊ शकणार असल्याकडे लक्ष वेधत कामाचा वेग वाढवावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरविकास विभागाकडे 300 कोटींच्या निधीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ आढावाच..
पुढील दोन पावसाळे म्हणजे सुमारे आठ महिने रस्त्यांसारखी विकासकामे बंद ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे कामांना त्वरित प्रारंभ करण्याचे आदेश या दौर्‍यात मिळतील, अशी आशा नाशिक- करांसह साधु-महंतांना होती. मात्र, साधुग्रामसाठी जागा अधिग्रहण किंवा नवीन शाही मार्गाबद्दल कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नाराजी प्रकट झाली.

सुरक्षेची ऐशीतैशी
मुख्य सचिवांसह इतर विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी, महसूल आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीस असताना गोल्फ क्लब विर्शामगृहावरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत ढिसाळ होती. पत्रकार परिषदेत निवेदन देणार्‍या अनेकांनी सहज प्रवेश मिळवला.