आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपोवनात जागा न दिल्यास कुंभमेळा होणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दीड वर्षावर कुंभमेळा आला असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित काम सुरू नाही. साधुग्रामसाठी तपोवन परिसरात 300 एकरपेक्षा अधिक जागेची गरज आहे. या जागेची पूर्तताच झाली नाही, तर साधू-महंत राहतील कुठे? तपोवन सोडून इतरत्र जागा देण्याची तयारी प्रशासन करीत आहे. मात्र, तपोवनात अपेक्षित जागा मिळाली नाही तर कुंभमेळाही होणार नसल्याचे महंत भक्तीचरणदास महाराज, महंत कृष्णचरणदास महाराज आणि महंत सुधीर पुजारी यांनी पत्रकारांशी शुक्रवारी येथे बोलताना सांगितले. कुंभमेळ्यासाठी 2060 कोटी रुपयांचा प्रस्ताव असून, त्यातील 500 कोटी रुपये खचरून कायमस्वरूपी किमान 200 एकर जमीन खरेदी केल्यास ती कुंभमेळ्यास उपयोगी ठरेल. त्यानंतर इतर 11 वर्षे या जागेचा उपयोग धार्मिक कार्यक्रमांसाठी करता येणार असल्याकडे महंतांनी लक्ष वेधले.

ते पुढे म्हणाले, दौर्‍यात मागील कुंभमेळ्यासाठी किती लोक आले होते, असा प्रश्न मुख्य सचिवांनी विचारल्यावर त्याचे समाधानकारक उत्तर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यापैकी कोणालाही देता आले नाही. यावरून कुंभमेळ्याबाबत प्रशासन किती गंभीर आहे, याची प्रचिती येत असल्याचे महंतांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. इतर राज्यांप्रमाणे येथेही कुंभमेळा प्राधिकरण स्थापण्याची गरज असून, गोदावरीच्या पात्रातील अतिक्रमणे काढून पात्र रुंद करण्याची आणि गंगापूर धरण ते तपोवनापर्यंत एक थेंबही प्रदूषित पाणी नदीपात्रात मिसळू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.

अखेर साधू-महंत निघून गेले
कुंभमेळ्याबाबत गोल्फ क्लब विर्शामगृहात दुपारी 12 वाजता साधू-महंतांबरोबर मुख्य सचिवांची बैठक नियोजित होती. त्यामुळे 11.45 वाजेपासूनच पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महंत सुधीरदास, महंत गोपालदास महाराज, महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती, महंत भक्तीचरणदास महाराज, महंत कृष्णचरणदास महाराज आदी उपस्थित होते. मात्र, एक वाजून गेला तरी त्यांना बोलावण्यात न आल्याने साधू-महंत विर्शामगृहातून निघून गेले. महंत सुधीरदास यांनी इतका वेळ थांबूनही साधू-महंतांशी चर्चा न केल्याने आता आपण मागण्या लेखी स्वरूपात देणार असल्याचे सांगितले, तर स्वामी संविदानंद यांनी नियोजित कार्यक्रम असल्याने जात असल्याचे सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथे बैठक
दरम्यान, गोल्फ क्लब विर्शामगृहावरील बैठक झाली नसल्याने कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात मुख्य सचिव बांठीया यांनी साधू-महंतांची दुपारी त्र्यंबकेश्वर येथे भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीला सहा आखाड्यांचे महंत उपस्थित होते.