आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पटेलरोड बंद; सेवांना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एन. डी. पटेलरोड नूतनीकरणाच्या कामामुळे तीन महिने बंद ठेवण्याची अधिसूचना निघाल्यानंतर, सरकारी कार्यालयापासून तर स्थानिक रहिवाशांपर्यंत अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. महत्त्वाच्या सरकारी सेवा तर बंद पडतीलच; मात्र रुग्णालयापासून तर भाजपच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयापर्यंत पोहोचता येणेही बिकट होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. आता त्र्यंबकरोड व गडकरी चौकातून सारडा सर्कलला समांतर असलेल्या एन. डी. पटेलरोडच्या कामासाठी तीन महिने रस्ता बंद राहणार असून, पर्यायी वाहतुकीबाबतची अधिसूचना वाहतूक पोलिस विभागाकडून मंगळवारी प्रसिद्ध झाली. येथे दोन मोठी रुग्णालये असून, गर्भवती मातांना तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्गही बंद होणार आहे. तसेच, भाजपचे कार्यालय येथेच असल्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनाही फटका बसेल. तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्यामुळे पक्षाचे मुख्य कार्यालयही उपयोगात येणार नाही. बीएसएनएल आणि बस डेपोलाही फटका बसेल.
बीएसएनएल होणार ठप्प
एन. डी. पटेलरोडवर भारतीय दूरसंचार निगम अर्थातच बीएसएनएलचे प्रमुख कार्यालय असून, येथे रोज तीन हजार ग्राहक कामानिमित्त येतात. प्रामुख्याने नवीन कनेक्शन, तक्रारीबरोबरच बिल भरण्याच्या कालावधीत येणार्‍यांची संख्या दुप्पट होते. त्यामुळे हा रोड पूर्णपणे बंद झाला तर ग्राहकांना येणे अवघड होईल. त्याचप्रमाणे त्यांची वाहने कोठे लावायची असा नवीन प्रश्न निर्माण होईल. त्याबरोबरच खोदकामासाठी यंत्राचा वापर झाल्यास 10 हजार रुपये मीटर दर असलेली कॉपरची वायर तुटून सेवा ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे शरणपूररोडच्या खालचा भाग, अशोकस्तंभ, पंचवटी, जुने नाशिक अशीच सर्वच सेवाही बंद पडेल. याबाबत बीएसएनएल लवकरच महापालिकेला पत्रही देणार आहे.

सावधपणे काम करावे
४रस्त्याचे काम बंद झाले तर बीएसएनएलचे काम ठप्प होईल. ग्राहक सुविधा केंद्राला फटका बसेल. त्याचप्रमाणे यंत्रसामग्रीऐवजी मनुष्यबळ वापरून काम न केल्यास कोट्यवधी रुपयांच्या वायर तुटून सेवाही बंद पडेल.
- एन. बी. पाटोळे, सहाय्यक महाव्यवस्थापक, बीएसएनएल, नाशिक

रुग्णांचे हाल होतील
४एन. डी. पटेलरोडवर दोन मोठी रुग्णालये असून, प्रसूतिगृहात येणार्‍या गर्भवती व मातांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जर रस्ता बंद ठेवला तर रुग्णांना पोहोचणेच अवघड होईल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने व एक बाजूने वाहतूक सुरळीत राहील, असे नियोजन केले पाहिजे.
डॉ. रुमी पटेल

महापौरांना भेटणार
४एन. डी. पटेलरोडचे काम करताना लोकांना त्रास होणार नाही व वाहतुकीचे नियोजन कोलमडणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तत्काळ महापौर, उपमहापौर व आयुक्तांची भेट घेणार आहे.
- लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष, भाजप

डेपो कसा बंद ठेवावा?
४ अद्याप अधिसूचना मिळालेली नाही. रोज 187 गाड्या देखभालीसाठी परिवहन महामंडळाच्या डेपोत येतात. रस्ता बंद झाला तर कामकाज ठप्प होईल. डेपो बंद करणे अशक्य असून, रस्ता सुरू ठेवण्यासाठी महापालिकेला विनंती केली जाईल.
- यामिनी जोशी, विभागीय वाहतूक नियंत्रक, परिवहन महामंडळ