आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निर्वाणी’च्या अर्थावरून महंतांचा शाब्दिक ‘आखाडा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळाया धार्मिक उत्सवात अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरा आजही अास्थेने जपल्या जातात साधू-महंत या धार्मिक कार्यातून पुढे नेण्याचे काम करीत असतात. मात्र, अाध्यात्मिक ज्ञानाचे समृद्ध भांडार मानले जाणारे दिग्गज महंत जगद‌्गुरूंमध्ये जेव्हा शब्दार्थावरूनच जुगलबंदी झाली, तेव्हा उलगडणारा शास्त्रार्थ वादही उफाळून आला. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज आणि जगद‌्गुरू रामानंदाचार्य स्वामी श्री हंसदेवाचार्यजी महाराज यांच्यात एका कार्यक्रमादरम्यान रंगलेली जुगलबंदी जेव्हा माईक खाली टाकण्यापर्यंत जाते तेव्हा उपस्थितांनीही डाेक्याला हात लावला.
ग्यानदास महाराजांनी वैष्णव पंथीय आखाड्यांची परंपरा उलगडून सांगत तिन्ही आखाड्यांचे शास्त्रीय महत्त्व सांगितले. निर्मोही म्हणजेच ज्याला कोणताही मोह नाही असा आखाडा, तर अंबर म्हणजे आकाश आणि धरती यादरम्यानचा म्हणजे दिगंबर आखाडा होय. तर ज्याला कोणतेही रूप नसते तो निर्वाणी आखाडा, असे सांगितले. याप्रसंगी तिथेच उपस्थित असलेल्या हंसादेवाचार्य महाराजांनी निर्वाणी शब्दाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने संदर्भ देऊन उलगडून सांगितला. ज्याला कोणतेही बंधन नाही तो निर्वाण अर्थात ‘निर्वाणी’ असा संदर्भ दिल्यानंतर त्याला आक्षेप घेत ग्यानदासांनी पुन्हा निर्वाणीचा अर्थ स्पष्ट केला. निर्वाणी शब्दाचा अर्थ संदर्भानुसार वेगळा असल्याचे मत हंसदेवाचार्यांनी ठामपणे व्यक्त केल्यानंतर ग्यानदास महाराजांचा राग अनावर झाला. त्यांनी निर्वाणी शब्दाचा शास्त्रार्थाला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट केला. त्यानंतर हंसदेवाचार्यांनी यावर बोलावे, असा आग्रह धरल्यानंतर मात्र जगद‌्गुरूंनी अरे भाई समज लो.. असे म्हणत माईक खाली टाकून दिला. दरम्यान, वादविवाद सुरू हाेताच काय करायचे, त्याचा अनुभव (महासभेवेळी विराेध तीव्र झाला किंवा वादविवाद रंगत असेल तर राष्ट्रगीत सुरू केले जाते.) असलेल्या महापौरांनी मध्यस्थी करत ध्वजारोहणाचा कार्यक्रम करूया, असे सांगत वादविवाद आवरता घेतला.

अातापर्यंत साधू-महंतांमध्ये वाद त्यांना मिळालेल्या साेयीसुविधांवरूनच रंगलेले हाेते. राजकीय नेते किंवा प्रशासनाशी रंगलेला वाददेखील प्रामुख्याने अशाच मुद्यांवरील हाेता. मात्र, गुरुवारी प्रथमच जाहीररीत्या साधूंमध्ये काही तात्त्विक वाद झाल्याचे चित्र उपस्थितांना बघायला मिळाले. या वादात काेण बराेबर, काेण चूक यापेक्षाही काही तत्त्वांसाठी प्रथमच वाद झाल्याची चर्चा कार्यक्रमानंतर सुरू हाेती.