आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदाघाटांचे ‘जलसंपदा’कडून पालिकेकडे होणार हस्तांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकुंभमेळ्यात रामकुंड परिसरातच भाविकांची स्नानासाठी गर्दी हाेऊ नये म्हणून नव्याने बांधण्यात अालेले सात घाट अाता जलसंपदा विभाग महापालिकेकडे हस्तांतरित करणार अाहे. त्यानंतर महापालिकाच या घाटांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेणार अाहे. या संदर्भातील प्रस्ताव अागामी महासभेत सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात अाले. या घाटांचे सुशाेभीकरण करून त्यांचा उपयाेग पर्यटनस्थळांसाठी व्हावा, अशी भूमिका यापूर्वीच ‘दिव्य मराठी’ने जाहीर केली अाहे.

शाहीस्नान पर्वणीप्रसंगी होणाऱ्या गर्दीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध घाट बांधणीचे काम प्रस्तावित होते. त्यानुसार एकूण २७४० मीटर लांबीचे घाट जलसंपदा विभागाने बांधले असून, त्याकरिता १३८.९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. घाटांना समांतर रस्ते, रॅम्प जाेडण्यात अाले अाहेत. हे काम वॉटर बाउंड मेकॅनिक तंत्राने केलेले आहे. भाविकांना सहजपणे ये-जा करता यावी, दुर्घटना घडू नये यावर विशेष भर देण्यात आला आहे. या घाटांवर तीनही पर्वण्यांमध्ये स्नानासाठी भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती. पर्वण्यांनंतर मात्र या घाटांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेत अाहे. संबंधित घाट अाहे त्या स्थितीत पडू दिल्यास त्यांचा दुरुपयाेग हाेण्याची शक्यता असून, त्यांचे साैंदर्यही अल्पावधीत लाेप पावू शकते.

या घाटांकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याची भूमिका ‘दिव्य मराठी’ने घेतली अाहे. स्थानिकांकडून या घाटांचा चाैपाटीसारखा वापर झाल्यास बेराेजगारांना राेजगार उपलब्ध हाेणार असल्याने घाटांचे पावित्र्य राखण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेण्याची गरज अाहे. त्यात नियमित नालेसफाई करण्यात यावी, पर्यटन म्हणून येण्यासाठी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी सायंकाळी ते या वेळेत घाट खुले करण्यात यावेत. पाणीपुरी, भेळपुरी, दाबेली, सॅण्डवीच अादी खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यास परवानगी असावी. मात्र, त्या तेथे कायमस्वरूपी नसाव्यात. त्यांना चाके असावीत. जेणेकरून त्या इतर वेळी तेथून हटवता येतील. या गाड्यांवर अंडा-भुर्जी, चायनीज फूड, पावभाजी असे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नयेत. त्यातून मद्यपानासारख्या प्रकारांना अाळा बसण्यास मदत हाेईल. या लहान व्यावसायिकांकडून महापालिकेला करदेखील प्राप्त हाेऊ शकेल, अशी भूमिका ‘दिव्य मराठी’ने यापूर्वीच स्पष्ट केली अाहे.

करार करणार...
^अतिशय सुंदर असलेले हे घाट अाम्ही महापालिकेकडे हस्तांतरित करणार अाहाेत. यासंदर्भात करारही करण्यात येईल. त्यानंतर त्यांचा चाैपाटीसारखा उपयाेग करायचा की अन्य, याविषयीचा निर्णय महापालिकाच घेईल. अार.एस. शिंदे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

खर्चाची जबाबदारी महापालिकेवर
नव्याने बांधण्यात अालेले सातही घाट अाता जलसंपदा विभागाकडून महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार अाहेत. तसा प्रस्तावही महापालिकेला देण्यात अाला अाहे. महापालिकेच्या उपायुक्तांनी घाट देखभाल दुरुस्तीसंदर्भातील प्रस्ताव तयार केला असून, ताे अागामी महासभेवर सादर केला जाणार अाहे. जलसंपदा विभाग महापालिका यांच्यात अंतिम करार झाल्यास घाटांच्या देखभाल दुरुस्तीचा संपूर्ण खर्च महापालिका करेल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात अाले.