आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वर येथील पर्वणीमुळे शहरात ठिकठिकाणी कोंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या त्र्यंबकेश्वर येथील तिसऱ्या शाहीस्नान पर्वणीमुळे शुक्रवारी (दि. २५) झालेल्या गर्दीने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शाहीस्नान पर्वणी, गणेशोत्सव बकरी ईद असे तीन मोठे सण एकत्र येणार असल्याचे वाहतूक विभागाला ज्ञात असूनदेखील वाहतुकीचे योग्य नियोजनच केल्यामुळे शहरात सकाळी प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सकाळी पुणेरोडवर झालेल्या ‘रास्ता रोको’मुळेदेखील कोंडीत भर पडली.

शहरात सकाळी बकरी ईदची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर गर्दी झाली होती. त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या पर्वणीतील शाहीस्नानासाठी जाणाऱ्या भाविकांचीदेखील याच वेळी गर्दी झाल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्र्यंबकरोडवर सर्वाधिक वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोंडीचा प्रभाव सीबीएस चौकापर्यंत दिसून आला. द्वारकामार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहनेही शहरातून पुढे जात असल्याने त्र्यंबकरोडवर गर्दी झाली होती. भाविकांची सर्वाधिक गर्दी एबीबी सर्कल रस्त्यावर निदर्शनास आली. पर्वणीनिमित्त गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासह आसामचे राज्यपाल या ‘व्हीआयपीं’च्या बंदोबस्ताची जबाबदारी शहर पोलिसांवर होती. त्यांचा ताफा त्र्यंबकरोडमार्गे जाणार असल्याने त्र्यंबकसाठी जाणारी सर्व वाहने आयटीआय सिग्नलजवळ थांबविण्यात येत असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गर्दी वाढत असल्याने शहर पोलिसांकडून ध्वनिक्षेपणाद्वारे भाविकांना त्र्यंबकेश्वरकडे जाता रामकुंडावर स्नानासाठी जाण्याची घोषणा करण्यात येत होती.

वाहतूक विभागावर नाराजी
अखेरच्या महत्त्वपूर्ण पर्वणीत वाहतूक विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने कोंडी झाली. पोलिस आयुक्तांना गर्दी नियंत्रणासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याने वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. सुमारे सहा वर्षांपासून दोन अधिकारी वाहतूक विभागात कार्यरत आहेत.

वाहतूक पोलिसांचे नियोजनच कोलमडले
पोलिस प्रशासनाने केवळ ईद आणि गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन केले होते. प्रत्यक्षात त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज आल्याने पोलिसांना वेळेवर नियोजन करणे अवघड झाले. परिणामी, शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.