आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाखवा, कुंभमेळ्यातील रस्त्यांवर खड्डे काेठे? पालिका पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसह पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यापाठाेपाठ नाशिकमध्येही नव्या काेऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून हाेणाऱ्या अाराेप-प्रत्याराेपांमुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थातील रस्त्यांच्या कामांची चाैकशी करण्याच्या दिलेल्या अादेशामुळे व्यथित हाेत महापालिका प्रशासन सत्ताधारी मनसेने गुरुवारी (दि. १४) स्थायी समितीच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींसमवेत रस्ते पाहणी दाैरा अायाेजित केला. पहिल्या पावसात सांगाडा उघडा पडलेले रस्ते टाळत दिंडाेरीराेड, पेठराेड, अाैरंगाबादराेड, साधुग्राममधील पाहणी करून ‘दाखवा, काेठे खड्डे पडले’, असे अाव्हानच त्यांनी दिले.
निवडणूक जवळ येत असल्याचे पाहून शिवसेना, मनसे भाजपतील राजकारण चांगलेच रंगात अाले अाहे. काेणत्या ना काेणत्या मुद्यावरून एकमेकांना खिंडीत पकडणाऱ्या पक्षांना चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे निमित्त सापडले अाहे. या खड्ड्यात शिवसेनेने वृक्षाराेपण करून अाव्हान दिले असताना भाजपने त्यापुढे जात पालकमंत्र्यांच्या ताेंडून थेट चाैकशीचे अस्त्र साेडल्यामुळे मनसे चांगलीच घायकुतीला अाली. त्यातून मनसेने ‘अामच्या काळातील रस्त्यांवर खड्डा दाखवा’ असे अाव्हान पत्रकाद्वारे देत खराब झालेले रस्ते शिवसेना-भाजपच्या काळातील असल्याचा दावा केला हाेता.

दरम्यान, मनसेबराेबरच प्रशासनही टीकेमुळे दुखावल्याने माध्यम प्रतिनिधींसमवेत गुरुवारी दुपारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात झालेल्या रस्त्यांची पाहणी करण्यात अाली. महापालिकेतून मुंबई नाकामार्गे सीबीएस, अशाेकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजामार्गे दिंडाेरीराेड, त्यानंतर म्हसरूळ येथून पेठराेड पेठराेडवरून नवीन बाजार समितीमार्गे तारावालानगर, हिरावाडी, अमृतधाम या मार्गाने अाैरंगाबादराेडची पाहणी करण्यात अाली. गंगापूरराेड, पेठराेड, दिंडाेरीराेड भागातील काही ठिकाणी रस्ते अस्तरीकरणाचे दाेन थर बाकी असल्यामुळे तेथे खड्डे पडणे स्वाभाविक असल्याचे कारण देत पाहणी टाळण्यात अाली. त्यानंतर शहर अभियंता सुनील खुने यांनी प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडताना सिंहस्थ कुंभमेळ्यातील रस्त्यांवर खड्डे नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी महापाैर अशाेक मुर्तडक, उपमहापाैर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, मनसे गटनेता अनिल मटाले, नगरसेवक यशवंत निकुळे अादी उपस्थित हाेते.

अमृतधाममधील या रस्त्यावर खड्डे नसल्याने महापाैर, उपमहापाैर, स्थायी सभापती-सदस्य महापालिकेचे अधिकारी कृतकृत्य झाले अन‌् त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान असे अाेसंडून वाहू लागले...

अंतर्गत वसाहतीतील रस्त्यांवरच खड्डे
शहरात दहा वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या काॅलनी रस्त्यांवर माेठे खड्डे असल्याचे खुने यांनी सांगितले. त्यासाठी १९० काेटी रुपयांच्या निधीतून रस्ते केले जाणार असून, स्थायी समितीने त्यास मान्यताही दिली अाहे. याव्यतिरिक्त शहरातील अनेक रस्त्यांचे अस्तरीकरण करणे गरजेचे असून, त्यासाठी निधीची अडचण असल्यामुळे सर्वच खड्डे लागलीच दुरुस्त हाेणार नाहीत, असा मुद्दाही त्यांनी मांडला.
बातम्या आणखी आहेत...