आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी कुंभमेळा सुकर होण्यासाठी ‘आयटी’च्या माध्यमातून प्रयत्न, डॉ. शिरीष साने यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिरीष साने यांची कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) या नामांकित संस्थेच्या उपाध्यक्षपदी गेल्या आठवड्यात निवड करण्यात आली. यानिमित्त त्यांनी ‘सीएसआय’ व विद्यार्थी, तसेच संगणक क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकासाठी असलेल्या प्रकाशवाटा व अडथळ्यांची माहिती दिली. आगामी कुंभमेळा सुकर होण्यासाठी ‘आयटी’च्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. डॉ. साने यांच्याशी साधलेला संवाद..

‘सीएसआय’चे काम नेमके कशा प्रकारे चालते?
‘सीएसआय’ ही देशभर काम करणारी संस्था आहे. विद्यार्थी, प्रोफेशनल्स व संगणकाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातील कामाशी ही संस्था निगडित असल्याने संस्थेची सर्व कामे ग्राउंड लेव्हलपासून उच्चभ्रू वर्गापर्यंत अशा विविध स्तरांवर चालतात.

‘सीएसआय’चे नाशकातील योगदान कसे आहे?
नाशिकमध्ये ‘सीएसआय’ संस्थेच्या बारा विद्यार्थी शाखा आहेत. त्यात प्रामुख्याने विद्यार्थिदशेतील आयटी व कॉम्प्युटरशी निगडित प्रत्येकासाठी काम केले जाते. नाशिकमधूनच देशभरात सर्वप्रथम आयटी क्वीझची सुरुवात करण्यात आली. एवढेच नाही, तर नाशिकमध्ये शाळांसाठीही अनेक वर्षांपासून निबंध स्पर्धांसारखे कार्यक्रम घेतले जातात.

नाशिकच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या?
नाशिकच्या विकासासाठी सर्वांत महत्त्वाचा प्रयत्न 2000 सालापासून सुरू आहे, तो म्हणजे आयटी पार्क उभारण्याचा. मात्र त्यासाठीचे प्रयत्न काहीसे तोकडे पडत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. माझ्या मते नाशिक ‘आयटी हब’ झाले, तर त्याला विकासाची दिशा लाभणार आहे. त्यासाठी इन्फोसिस, इंटेलसारख्या मोठय़ा कंपन्यांचे लक्ष्य नजरेसमोर ठेवणे गरजेचे आहे.

नाशिकसाठी तुमचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ कोणते?
आगामी कुंभमेळ्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा विचार आम्ही करत आहोत. त्यात प्रामुख्याने पोलिस यंत्रणेच्या नजरेखाली शहरातील प्रमुख रस्ते राहतील, अशी कॉम्प्युटराइज्ड यंत्रणा तयार करणे, इन्फॉर्मेशन केयॉसद्वारे भाविकांना रस्ते व दिशांचे मार्गदर्शन मिळेल अशी यंत्रणा तयार करणे, त्यासाठी जीपीएस सिस्टिमचा वापर करण्याचे प्रयत्न करणार आहोत.

विविध शाखांच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल?
सध्या प्रचंड स्पर्धा आहे. मात्र, स्पर्धेला आव्हान समजा, अडथळे समजाल तर अडचणी येत राहतील. सध्या इंडस्ट्रीमध्ये फंडामेंटल कन्सेप्ट्स ज्यांना माहीत आहेत अशा लोकांना मोठी संधी आहे. व्यवस्थापन, व्यवहार व अभियांत्रिकी या तिन्ही गुणांमध्ये प्रत्येकाला पारखून घेतलं जाणार आहे. आपण शिकलेल्या गोष्टींचा देशासाठी उपयोग करण्याला प्राधान्य देणेदेखील गरजेचे आहे.