आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा रुग्णालयाचे ड्रेनेज तुंबले, आॅर्थो वार्डमधील रुग्ण रात्रभर दुर्गंधीयुक्त पाण्यात, दोघे अत्यवस्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंहस्थ कुंभमेळा रुग्णालयात ड्रेनेजचे तुंबलेले पाणी शिरले. - Divya Marathi
सिंहस्थ कुंभमेळा रुग्णालयात ड्रेनेजचे तुंबलेले पाणी शिरले.
 नाशिक: सिंहस्थात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या कुंभमेळा रुग्णालयाचे बांधकाम आणि ड्रेनेज कामाचा निकृष्ट दर्जा सोमवारी (दि. २९) उघड झाला. रुग्णालयाच्या आॅर्थो वाॅर्डमध्ये ड्रेनेज तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने पूर्ण रात्र रुग्णांना तशा स्थितीतच काढावी लागली. खाटेअभावी जमिनीवर झाेपलेले दाेन बेवारस रुग्ण या पाण्यामुळे अत्यवस्थ झाले. एवढा गंभीर प्रकार हाेऊनही बांधकाम विभागाने बिलाअभावी दुरुस्तीचे काम करण्यास असमर्थता दर्शवली. 
जिल्हा रुग्णालय परिसरात हे रुग्णालय असून, अनेक दिवसांपासून तुंबलेल्या पाण्याला वाट मिळाल्याने काही वेळातच अाॅर्थाे वार्डमध्ये पाणी साचले.
 
हात-पाय मोडलेल्या रुग्णांचे त्यामुळे हाल झाले. परिचारिकांनी ही बाब तत्परतेने वरिष्ठांना कळवली; मात्र काही उपयोग झाला नाही. कर्मचाऱ्यांनी काही रुग्णांना खाटांसह वार्डबाहेर नेले. मात्र, दोन बेवारस रुग्णांना खाट नसल्याने ते रात्रभर पाण्यातच पडून राहिले. सकाळी त्यांची प्रकृती अधिकबिघडली.
 
सकाळी ही बाब रुग्णालय प्रशासनाने बांधकाम विभागास कळवली. मात्र, संबंधित विभागाकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीच वाॅर्डची स्वच्छता केली. शौचालयाचे पाणी रुग्णालय परिसरात पसरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीने इतर वाॅर्डमधील रुग्णांच्या आरोग्यावरही परिणाम झाला.
 
अनेकवेळा तात्पुरतीच स्वच्छता : कुंभमेळा रुग्णालयाचे निकृष्ट काम आणि ड्रेनेजबाबत आरोग्य विभागाने बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या अाहेत. मात्र, संबंधित विभागाकडून कंत्राटदाराद्वारे तात्पुरती स्वच्छता करून वेळ मारून नेली जात होती. 
 
जुनी बिले मिळाल्याने कामास नकार 
बांधकाम विभागाच्या ‘कायाकल्प’चे सुमारे दीड कोटींचे बिल आरोग्य विभागाने जिल्हा नियोजन विभागाकडे पाठवले आहे. त्याची रक्कम अद्याप बांधकाम विभागाला मिळालेली नसल्याने चार महिन्यांपासून बांधकाम विभाग जिल्हा रुग्णालयातील कामे करण्यास असमर्थता दर्शवत असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
आरोग्य विभागाकडून तातडीने स्वच्छता 
- ड्रेनेजची तातडीने स्वच्छता करण्यात आली आहे. सकाळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाॅर्ड स्वच्छ केला. वाॅर्डमधील रुग्णांना शेजारील वाॅर्डमध्ये हलवण्यात आले आहे. डॉ.जी. एम. होले, निवासी शल्यचिकित्सक 
 
इमारत नवी, ड्रेनेज जुने 
कुंभमेळा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करताना जुन्या ड्रेनेजवरच भागवून घेण्यात आले असल्याने ड्रेनेज तुंबल्याची चर्चा आहे. ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ‘मिलीभगत’ नवीन कुंभमेळा रुग्णालय मृत्यूशय्येवर जाण्यास कारणीभूत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...