आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यासाठी हवा ठोस नियोजनाचा पाया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन हे लोकसहभागातून आणि दूरदर्शी धोरणातूनच होणे अत्यावश्यक असते. तो दर बारा वर्षांनी होणारा सोहळा असल्याने त्याबाबतचे नियोजन हे तात्पुरते नव्हे; तर कायमस्वरूपी असावे, असे प्रतिपादन प्रख्यात आर्किटेक्ट आणि कुंभमेळा नियोजनतज्ज्ञ पी. व्ही. के. रामेश्वर यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या परिसंवादात रामेश्वर यांनी उज्जैनमध्ये 2016 ला होणार्‍या कुंभमेळ्याबाबत सुरू असलेल्या तयारीबाबतची माहिती दिली. उज्जैनमधील कुंभमेळ्याच्या तयारीला 2010 पासूनच प्रारंभ झाला असून आमचे 2021 पर्यंतच्या कामांचे नियोजन निश्चित झाले आहे. तसेच या नियोजनात नदी व शहराच्या मूळ सौंदर्याला कुठेही बाधा पोहोचू नये, यावर भर द्यायला हवा. तसेच दूरगामी विचार, राजकीय इच्छाशक्ती आणि मदत, योजनेनुसार प्रत्यक्ष अमलबजावणी, दूरदृष्टीने नियोजन आणि त्वरित दृष्टिक्षेपात दिसणारी कामे अशा सर्व बाबी विचारात घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही रामेश्वर यांनी नमूद केले. स्लाइड शोच्या सादरीकरणातून नाशिकमधील कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत दिशादर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने माजी अध्यक्ष सुनील कुटे यांनी संस्थेच्या वतीने केल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती देऊन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश विशद केला; तर अध्यक्ष अनुप मोहबन्सी यांनी कुंभमेळ्यांच्या वृत्तांमधून गत कुंभमेळयांचा आढावा सादर केला. मागील कुंभमेळ्यात जवळपास 350 खालसे आले होते.

ही संख्या दुप्पट होणार असल्याने यंदाच्या कुंभमेळ्याचे नियोजन अधिक व्यापक आणि अचूक करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी रामेश्वर यांच्या हस्ते आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुदत्त नेरकर आणि अर्पिता भट यांनी केले. संघटनेचे सचिव शीतल चौघुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.