आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे आता ‘माझं वाचनालय’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानने आता ‘माझं वाचनालय’ हा नवीन उपक्रम सुरू केला असून, शनिवारी (दि. १०) वाचकदिनी या उपक्रमातील नाशिक केंद्राचे उद‌्घाटन कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे.‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाने हवं ते पुस्तक वाचकाच्या हातात देण्याचं काम कुसुमाग्रज प्रतिष्ठानने केलं. पण, एकावेळी एक पुस्तक वाचून ज्याच्याकडे पेटीची जबाबदारी आहे, त्याच्याकडे पुन्हा द्यावे लागते. आता मात्र वाचकांना आपल्याजवळ २५ पुस्तकांची एक पेटीच ‘माझं वाचनालय’ या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून ठेवता येणार आहे. वाचक वाचनालयापर्यंत येत नाहीत म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानने सुरू केलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम काही नवीन नाही.

या उपक्रमातून जगभरात पेट्या जातात आणि रसिक वाचनाचा आनंद घेतात. पण, ३५ जणांच्या गटासाठी १०० पुस्तकांची एक पेटी असे त्याचे स्वरूप असल्याने वाचनाची भूक भागत नाही. अतिशय वाचनप्रिय वाचकांसाठी मग प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे आणि पेटी वाचनालयाचे प्रमुख विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून ‘माझं ग्रंथालय’ ही कल्पना पुढे आली आहे. याबाबत रानडे म्हणाले की, आपल्याकडे मराठी वाचणारे बरेच आहेत. पण, परराज्यात वा परदेशात असे होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी पेटी वाचनालयाला मर्यादा येत होत्या. मग या वाचकांसाठी काय करावे, या विचारातून ‘माझं ग्रंथालय’ ही कल्पना सुचली. मग आम्ही तशा बॅगा डिझाइन केल्या. याचा पहिला प्रयोग आम्ही ठाण्यात केला. तो पूर्ण यशस्वी झाल्यानंतर मग पुणे गाठलं. तेथेही उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर आता नाशिकला हा उपक्रम सुरू करत आहोत.

असे आहे स्वरूप
एका पेटीत चांगली २५ पुस्तके असतील एका सभासदाकडे ती पेटी तीन महिन्यांसाठी राहील. त्यात विविध पुस्तके असल्याने तो वाचनाचा आनंद घेऊ शकतो, प्रवासातही याचा उपतोग होऊ शकतो. तीन महिन्यांनंतर त्या भागातील ज्यांच्याकडे अशी पेटी आहे, त्यांनी ती आपसात बदलायची आहे. म्हणजे पुन्हा वेगळी पुस्तके वाचण्याची संधी मिळेल.