आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुसुमाग्रज अध्यासन 2 वर्षांपासून निद्रिस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचा वसा घेतलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे गीत लिहिणारे आणि नाशिकचे नाव देशातील साहित्यविश्वात अजरामर करणारे कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या नावाने मुक्त विद्यापीठाने सुरू केलेले अध्यासन गेल्या दोन वर्षांपासून पूर्णवेळ संचालकांअभावी बंद पडले आहे.
 
विशेष म्हणजे ‘नटसम्राट’ वगळता तात्यासाहेबांच्या एकाही नाटकाचे दृकश्राव्‍य डॉक्युमेंटेशन उपलब्ध नसल्याने या अध्यासनातर्फे त्याचा प्रस्ताव मंजूर होऊन त्यासाठी सर्व तांत्रिक यंत्रणा उपलब्ध असूनही गेल्या तीन वर्षांपासून तो बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे.  

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज (तात्या) यांच्या नावे जागतिक मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. परंतु तात्यांचे साहित्य खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी तसेच त्याचे संवर्धन होण्याच्या उद्देशाने त्यांच्या नाटकांचे दृक््श्राव्य डॉक्युमेंटेशन होणे ही काळाची गरज आहे. सध्या फक्त ‘नटसम्राट’ वगळता कुसुमाग्रजांच्या एकाही नाटकाची चित्रफीत नाही. फक्त त्यांच्या आवाजातील एकाच कवितेची एकच ऑडिओ क्लिप नाशिकमधील त्यांच्या निकटवर्तीयांकडे आहे. अन्य कविता आणि साहित्याचे डॉक्युमेंटेशन दूरच. म्हणूनच मुक्त विद्यापीठाच्या सदर अध्यासनाच्या माध्यमातून कुसुमाग्रजांच्या सर्व नाटकांचे, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या निकटवर्तीयांचे आणि त्यांच्या साहित्याच्या अभ्यासकांचे दृकश्राव्‍य डॉक्युमेंटेशन करण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प सन २०१३ मध्ये आखण्यात आला. 

त्यासाठीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला; परंतु गेल्या चार वर्षांपासून तो बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या साऱ्याची अंमलबजावणी ज्यांनी करणे अभिप्रेत आहे असा पूर्णवेळ संचालकच गेल्या दोन वर्षांपासून नेमण्यात आलेला नाही. सन २०१३-१४ मध्ये श्याम पाडेकर आणि त्यांच्यानंतर सन २०१४-१५ ला डॉ. माधवी धारणकर यांच्यानंतर गेल्या दोन वर्षांत या अध्यासनास संचालकच नाही. शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या डॉ. विजया पाटील यांच्याकडे कुसुमाग्रज अध्यासनाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. परंतु उचित यंत्रणेअभावी सदर अध्यासन गेल्या दोन वर्षांत एकही वेगळा उपक्रम घेऊ शकलेले नाही.   

केवळ पुरस्कारांचे साेहळे  
सन २०१० च्या जानेवारीत मुक्त विद्यापीठाने कुसुमाग्रज अध्यासनाची स्थापना केली. मराठी भाषेचा प्रसार करणे, नवोदित लेखकांना चालना देणे आणि मराठीतील सकस साहित्य निर्मितीत सहभाग घेणे हे याचे उद्देश होते. तसेच कुसुमाग्रजांच्या साहित्याचे आणि एकूणच मराठी भाषेचे अध्यापन कसे करावे याविषयी प्रशिक्षणही आखण्यात आले होते. तसेच अमराठी भाषक साहित्यिकांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सदर पुरस्कार वितरण सोहळ्यांव्यतिरिक्त भाषा संवर्धनाचे आणि महत्त्वाचे म्हणजे कुसुमाग्रजांच्या साहित्याशी निगडित सर्व उपक्रम बंद पडले आहेत.   

काही उपक्रमांचे नियाेजन, मात्र पुढे ढकलले : विजया पाटील  
‘अध्यासनातर्फे विशाखा पुरस्कार सुरू आहेत, त्याशिवाय नवोदित कवी आणि लेखकांसाठी काही उपक्रमांचे नियोजन केले होते, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे ते पुढे ढकलावे लागले,’ असे स्पष्टीकरण अध्यासनाच्या प्रभारी प्रा. विजया पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केले. परंतु विशाखा काव्य पुरस्कार कुसुमाग्रज अध्यासनाच्या स्थापनेआधी १९९० पासून देण्यात येतो. त्यामुळे दोन वर्षांपासून कुसुमाग्रज अध्यासन निद्रिस्त झाले आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...