आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीवर पर्याय व्हॅटवर सरचार्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एलबीटी आणि जकात हे दोन्हीही कर नको, त्याला पर्यायच हवा असेल तर मूल्यवर्धित करावर (व्हॅट) 0.5 ते 1 टक्का सरचार्ज घेतला जावा आणि सरचार्जपोटी जमा झालेली रक्कम महापालिकेच्या बॅँक खात्यात दैनंदिन जमा व्हावी, अशी एकवाक्यता शहरातील उद्योजक, व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये गुरुवारी दिसून आली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एलबीटी किंवा जकात किंवा त्याला काय पर्याय अपेक्षित आहे, याची मते जाणून घेण्यासाठी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविण्यात येणार आहे.
फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ मर्चंटस्सह राज्यातील काही प्रमुख व्यापारी संघटनांचे नेते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांतील व्यावसायिकांची मते जाणून घेऊन राज्य शासनाला महापौरांनी अहवाल पाठवायला सांगितले होते. त्यानुसार पालिकेत महापौर दालनात बोलाविण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत एलबीटी आणि जकात या दोन्ही करांना विविध व्यावसायिक आणि उद्योजक संघटनांनी एकमुखी विरोध केला.
बैठकीत यांचाही सहभाग

आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, महाराष्‍ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, रमेश पवार, मंगेश पाटणकर, सी.ए.असोसिएशनचे अध्यक्ष विक्रांत कुलकर्णी, आर्किटेक्टस् असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश चव्हाण, राजेंद्र अहिरे, व्हिनस वाणी, ज्ञानेश्वर गोपाळे, राहुल डागा यांसह व्यापारी, उद्योजक, उपायुक्त हरिभाऊ फडोळ आदी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

व्यापारी महासंघाकडून आभार

नाशिक व्यापारी महासंघाने महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या आभाराचा ठराव मंजूर केला. सर्वपक्षीय नेत्यांनी व्यावसायिकांच्या भावना समजावून घेतल्या, तसेच मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन महासंघाने केले आहे.