आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटी विवरणपत्रामुळे धास्तावले व्यावसायिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) 2013-14 या आर्थिक वर्षासाठीच्या वार्षिक परतावा विवरणपत्र सादर करण्यासाठी अवघ्या पंधरा दिवसांची मुदत बाकी असून, विवरणपत्रात मागवलेल्या किचकट माहितीमुळे व्यावसायिक धास्तावले आहेत. चुकीची माहिती भरली गेली तर नाहक दंडाची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुदतवाढीची मागणी महापालिकेकडे व्यापारी-व्यावसायिकांच्या संघटना करण्याच्या तयारीत आहेत. व्यापारी-व्यावसायिकांनी भरलेल्या एलबीटीचे वार्षिक परतावा विवरणपत्र भरून देण्यासाठी पालिकेने 30 जून ही अंतिम मुदत दिली आहे. विवरणपत्र भरण्यासाठी एक टक्का एलबीटीधारकांकडूनच 18 जूनपर्यंत प्रतिसाद मिळाला आहे. विवरणपत्रात अनेक प्रकारची किचकट माहिती विचारली असून, ती ऑडिट आणि करसल्लागार किंवा लेखापरीक्षक यांच्या मदतीशिवाय भरणे अशक्य असल्याने ही स्थिती उद्भवल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
विवरणपत्रात मागवलेल्या माहितीत वर्षभरातील खरेदी-विक्रीच्या रजिस्टर झेरॉक्ससह, पावत्या, शहरातून केलेल्या खरेदीची वेगळी नोंद, बाहेरील शहरातून आणि परराज्यातून आलेल्या मालाची वेगवेगळी माहिती मागवली आहे. वार्षिक लेखापरीक्षण अहवालही जोडणे आवश्यक असून, मूल्यवर्धित कराचे अनेक व्यापा-यांनी आपले आॅडिट (लेखापरीक्षण) अद्याप पूर्ण केलेले नाही. यामुळे असा अहवालच अनेकांकडे उपलब्ध नसल्याने विवरणपत्र भरण्यास अडचणी निर्माण झाल्याचे बहुतांश व्यावसायिकांचे मत आहे.

याचसाठी लढा सुरू आहे
कर भरण्याला विरोध नाही; मात्र करप्रणाली सुटसुटीत असावी अशी आमची मागणी आहे. एलबीटी जाचक असून, त्यामुळे भ्रष्टाचार वाढणार असल्यानेच आम्ही त्याचा कडाडून विरोध करीत आहोत.
प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष, फाम
किचकट विवरणपत्र
विवरणपत्रच इतके किचकट आहे की ते तज्ज्ञांच्या मदतीशिवाय भरताच येणार नाही. ते योग्य पद्धतीने भरले नाही तर दंडाची नामुष्की आहेच. आॅडिटही पूर्ण झालेले नाहीत, अशा स्थितीत कसे विवरणपत्र भरणार? मुदत वाढवून मिळाली पाहिजे.
राहुल डागा, नाशिक व्यापारी महासंघ