आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चतुर्थश्रेणी कामगारांच्या मुलांसाठी ‘ज्ञानगंगोत्री’; मुक्त विद्यापीठात कुलगुरू वायूनंदन यांचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्त विद्यापीठातील ग्रंथालयात पुस्तकांच्या विश्वात चतुर्थश्रेणी कामगारांची मुले. समवेत अधिकारी. - Divya Marathi
मुक्त विद्यापीठातील ग्रंथालयात पुस्तकांच्या विश्वात चतुर्थश्रेणी कामगारांची मुले. समवेत अधिकारी.
नाशिक- एरवी शेतात, कार्यालयात मिळेल ते काम करणारे कर्मचारी वर्षभर ऊन, वारा, पाऊस, थंडी याची जराही पर्वा करता राबत असतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वर्षानुवर्षे राबणाऱ्या अशा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही इतरांप्रमाणे ज्ञानार्जनाची संधी मिळाली, या हेतूने विद्यापीठ आवारातील अद्ययावत ग्रंथालय आणि माहितीस्रोत केंद्र खुले केले आहे. कुलगुरू प्रा. इ. वायूनंदन यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलांना ज्ञानसाधनेची मोठी संधी मिळाली आहे. 
 
समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षित करण्याचे काम मुक्त विद्यापीठ गेल्या २७ वर्षांपासून करत आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतलेल्या प्रा. इ. वायुनंदन यांना काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांची १५-२० मुले विद्यापीठ परिसरात बागडताना आढळून आली. त्यांनी त्या मुलांशी आपुलकीने संवाद साधला आणि तुम्हाला कशाची आवड आहे, सुटीत काय करायला आवडते, अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचायला आवडतील का, संगणक शिकायला चालेल का, असे प्रश्न विचारले होते. 
 
त्यावर मुलांकडूनसुद्धा तसाच प्रतिसाद मिळाला. त्यांनी कधी चार भिंतीबाहेरचे जग पाहिले नव्हते, अशा सर्वांनीच लगेचच होकार दिला. त्यानंतर कुलगुरूंनी सर्व मुलांना विद्यापीठातील अद्ययावत ग्रंथालय आणि माहितीस्रोत केंद्रात नेऊन पुस्तकांचे आकाश खुले करून दिले. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यासाठी ग्रंथालय केंद्राचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे आणि सहायक ग्रंथपाल प्रकाश बर्वे यांनी अशा सर्व मुलांना पुस्तकांशी नाते कसे जोडावे, वाचावे कसे, कोणत्या प्रकारची पुस्तके वाचावीत अशा अनेक गोष्टी शिकवितात. 
 
जीवनात पुस्तकांचे किती महत्त्वाचे स्थान आहे हे समजावून वाचन संस्कृती जोपासण्याचा आत्मविश्वास दिला. विशेष म्हणजे विद्यापीठ ग्रंथालय आता प्रत्येक शनिवारीही सुरूच ठेवण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतल्याने सुटीच्या दिवशी या ग्रंथालयाचा उपयोग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
 
 योग्य दिशा देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल 
- विद्यापीठाच्या वाटचालीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे योगदानदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच या कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या पाल्यांचीसुद्धा काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही साक्षर करून चांगले ज्ञान, योग्य दिशा देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांत वाचनाची अभिरुची वाढेल. -कुलगुरू प्रा. इ. वायूनंदन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. 
 
बातम्या आणखी आहेत...