आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरणावर मजूर बनले सुरक्षारक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकच्या जलसंपदा विभागात कर्मचार्‍यांची वानवा जाणवत असल्याने गंगापूर धरणाची सुरक्षा सध्या मजुरांच्या हाती आली आहे. त्यामुळे परिसरातील काही ट्रकचालक सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा धरण परिसरातील मुरुमाची चोरी करतात. पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनदेखील संरक्षण मिळत नसल्याचा आरोप जलसंपदाच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

357 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या गंगापूर धरणात सध्या 43 टक्के म्हणजे दोन हजार 413 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने पाणीसाठा कमी आहे. मात्र, पावसाच्या हंगामात पाणीसाठा 80 ते 90 टक्केपर्यंत असल्याने पाण्याचा परिसर वाढतो. मात्र, सध्या शासनाच्या पेपरलेस धोरणामुळे नवीन कर्मचार्‍यांची भरती न करता आहे त्या कर्मचार्‍यांवर काम सुरू आहे. त्यामुळे धरणाचा परिसर एवढा मोठा असूनही धरणाच्या सुरक्षेसाठी एकही चौकीदार नाही. त्यामुळे सध्या येथे असलेल्या 13 मजुरांनाच चौकीदारीची भूमिका राबवावी लागत आहे. त्यासाठी त्यांच्या वेळा नेमून देण्यात आल्या आहेत.

धरणाच्या परिसरात कोणीही प्रदूषण तसेच गैरवर्तन करू नये, यासाठी शासनातर्फे केवळ सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत; मात्र या कॅमेर्‍यांची क्षमता अपुरी असल्याने धरणाचा संपूर्ण परिसर कॅमेर्‍यांच्या दृष्टिक्षेपात येत नाही. त्यामुळे सावरगाव, गंगावर्‍हे, गोवर्धनच्या बाजूच्या रस्त्याने येऊन मुरूम चोरी केली जाते. मुरूम काढल्याने जागोजागी खड्डे झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्यासोबत माती धरणात वाहून येणार असल्याने पूर्वीच मातीमुळे धरणाची साठवणक्षमता कमी झाली असून, त्यामध्ये अधिक भर पडणार आहे.


अखेर ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
गंगापूर धरणक्षेत्रात कचरा टाकण्याचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जलसंपदा विभाग व पोलिस यंत्रणा जागी झाली. याबाबत जलसंपदा विभागाने ट्रक चालकाविरुद्ध तालुका पोलिसात तक्रार देणे अपेक्षित असताना दोन दिवस उलटूनही तक्रार न दिल्याने त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप निकम यांनी एमडब्लूएन 1093 या क्रमांकाच्या ट्रकचा मालक शांताराम रामचंद्र कापसे (रा. गोर्वधन) याच्याविरुध्द मुंबई पोलिस अधिनियम 115(ग),177,120 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, गुरुवारी त्याला कोर्टासमोर उभे केले जाईल.


अधिकार्‍यांचे धरण सुरक्षेकडे दुर्लक्ष
गंगापूर धरणासह विभागातील सर्व धरणांची सुरक्षा ठेवणे हे कार्यकारी अभियंत्याचे काम आहे. मात्र, गंगापूर धरण क्षेत्रातील मुरुम चोरी, धरण परिसरात कचरा टाकणे, येथील पक्षी अधिवास कायम राखणे याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत संबंधितावर काही कार्यवाही केली का, असा प्रश्न जबाबदार अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता ए. एन. म्हस्के यांना विचारला असता त्यांनी ‘खालच्या लोकांनी काय कारवाई केली ते माहीत नाही’ असे उडवाउडवीचे उत्तर दिले.


खासगी सुरक्षारक्षकाची मागणी
धरणासाठी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि खाजगी सुरक्षारक्षकांची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. तसेच या भागात कायमस्वरूपी पोलिसांची गस्त पाहिजे. पी. पी. सोनवणे, शाखाधिकारी