आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनस्थळांवर सुरक्षिततेचा अभाव; तरुणाईची मात्र मृत्यूच्या दाढेत धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पावसाळ्यात तरुणाईसह सर्वच वयोगटातील नागरिकांना निसर्गरम्य वातावरणात ट्रिपचे वेड लागते. अशा वेळी पावसात मनसोक्त भिजण्यासाठी धरण परिसर, धबधबा, घाट-डाेंगरमाथ्यावर फिरायला जाण्यास सर्वाधिक पसंती दिली जाते. नाशिक परिसरात असलेल्या अशा ठिकाणांमध्ये साेमेश्वर, गंगापूर बॅक वाॅटर, इगतपुरी, त्र्यंबकराेडवरील काही धबधब्यांची ठिकाणी तसेच तपाेवन अशा काही स्थळांचा समावेश अाहे. जेथे पर्यटकांची माेठी गर्दी हाेत असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी पाण्याने धाेक्याची पातळी अाेलांडली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही ठाेस उपाययाेजना केल्या गेल्या नसल्याने अाणि अाहे त्या साधनांची पुरती वाताहत झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला अाहे.
साेमेश्वर धबधबा, तपाेवनातील रामसृष्टी उद्यान परिसर गंगापूर बॅक वाॅटर परिसरात दरवर्षीपेक्षा यंदा प्रचंड प्रमाणात पाण्याची पातळी वाढूनही अावश्यक ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात अालेली दिसून येत नाही. परिणामी, नागरिकांकडूनही धाेक्याची चाैकट अाेलांडून थेट नदीपात्रात शिरण्याचे धारिष्ट्य दाखवले जात अाहे. धाेकादायक स्टंट करीत सेल्फी काढण्याची क्रेझ अद्यापही कायम असून, असे करणाऱ्यांना हटकणारी यंत्रणा मात्र कुठेही दिसून येत नाही.
पालिका प्रशासनाकडून अशा ठिकाणांवर धाेक्याची सूचना देणाऱ्या फलकांची उभारणी हाेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ‘करू... बघू...’ या पलीकडे भूमिका घेताना प्रशासन दिसून येत नाही. परिणामी, यंदाही नदीपात्रात बुडणाऱ्यांची सं‌ख्या माेठीच अाहे. पाेलिस प्रशासनाकडूनही अशा ठिकाणी स्टंट करणाऱ्यांवर कारवाई हाेताना दिसून येत नाही, त्यामुळे तरुणाई बेलगाम हाेऊन जीव धाेक्यात घालताना दिसून येत अाहे.

‘नो सेल्फी झोन’ घाेषित करणे गरजेचे
मंबई, पुण्यात खाेल पाण्यात, तसेच धाेकादायक ठिकाणी सेल्फीच्या क्रेझमुळे अनेकांनी प्राण गमावले अाहे. नाशकातही ही क्रेझ कायम असून, अशा घटनांत जीव गमावणाऱ्यांची संख्याही वाढतीच अाहे. या पार्श्वभूमीवर धाेकादायक ठिकाणांना ‘नाे सेल्फी झाेन’ म्हणून घाेषित करावे, अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी केली अाहे.

धोकादायक ठिकाणी नागरिकांनीच जाऊ नये...
^खोलनदीपात्र,धबधब्याजवळील धोकादायक ठरू शकणाऱ्या ठिकाणी नागरिकांनीच खबरदारी घेत जाणे टाळले पाहिजे. याबाबत प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. धोकादायक ठिकाणी नागरिकांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. -प्रशांत वाघमारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

पाेलिसांकडूून नागरिकांमध्ये जनजागृती..
^धबधबा,धरणपरिसर तसेच थेट नदीपात्रात नागरिकांनी जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी त्या-त्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना करू. -सचिन गोरे, सहायक पाेलिस अायुक्त
सेल्फीसाठी थेट धाेकादायक नदीपात्रात प्रवेश; तुटलेल्या पुलावरही फाेटाेसेशन

या उपाययोजना हाेणे अपेक्षित
{नागरिकांमध्येधोकेदायक ठिकाणी जाण्याबाबत जनजागृती गरजेची; ठिकठिकाणी सूचनाफलक हवेत...
{सोमेश्वर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने ठरावीक अंतरावर लोखंडी जाळ्या वा ग्रिल बसविण्यात यावेत
{गंगापूर धरण बॅक वाॅटर परिसरात प्रवेशाबाबत नियम असावेत, त्याकडे डोळेझाक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
{पोलिसांनीही माेहीम राबवून दंडात्मक कारवाई करावी
{काही अपघात घडल्यास बचावकार्यासाठी, मदतीसाठी प्रशासनाकडून जीवरक्षकांची नेमणूक अथवा मदतीच्या अन्य सक्षम सुविधा तत्काळ उपलब्ध असाव्यात
{या उपाययाेजनांची नियमित तपासणी व्हावी, यासाठी विशेष पथकाची नियुक्ती व्हायला हवी
काय आढळले ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत?
‘डी.बी. स्टार’ प्रतिनिधीने शहरातील गंगापूर बॅक वाॅटर, सोमेश्वर, तपाेवन परिसरात पाहणी केली असता मुसळधार पावसामुळे पाण्याने धाेक्याची पातळी अाेलांडली असतानाही तरुण-तरुणी थेट नदीपात्रात प्रवेश करून, तसेच साेमेश्वरला अगदी कड्यांवर उभे राहून सेल्फी काढताना दिसून अाले. अनेकांची तर अशा धाेक्याच्या क्षणी माैजमस्तीही सुरू असल्याचे दिसून अाले. विशेष म्हणजे, अशा बेपर्वाई करणाऱ्या नागरिकांना वा तरुणाईला राेखण्यासाठी कुठलीही यंत्रणाच नसल्याचेही दिसून अाले. अशा घटनांत मृत्यू हाेणाऱ्या वा जखमी हाेणाऱ्यांची संख्या वाढतीच असतानाही पालिका प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांचे धारिष्ट्य वाढत अाहे. सूचनाफलक अन‌् लाेखंडी ग्रिल शेवटच्या घटका माेजत असताना पालिकेचे जीवरक्षकही अाढळून अाले नाहीत.
अनिल महाजन, मुख्य अग्निशमन अधिकारी

थेट प्रश्न
शहरातील अनेक पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेच्या उपाययाेजनांची पहिल्याच मुसळधार पावसात वाताहत झाली. हाकेच्या अंतरावरील काही निसर्गरम्य ठिकाणांवरही सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी उपाययाेजना केल्या गेल्या नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला अाहे. या पार्श्वभूमीवर ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययाेजना करणे तर दूरच, परंतु धाेक्याची चाैकट अाेलांडणाऱ्या नागरिकांना मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून राेखण्यासाठी कुठलीही यंत्रणाच नसल्याचे दिसून अाले. परिणामी, अशा ठिकाणी हाेणाऱ्या अपघातांची संख्या वाढतीच असल्याचे दिसून येते.
{ साेमेश्वर परिसरातील धबधब्याजवळ पूर्वी बसवलेल्या लोखंडी ग्रिल पूर्णत: तुटल्याने नागरिक थेट धाेकादायक कथड्यांपर्यंत पाेहाेचतात. यामुळे अपघाताची शक्यता असून, या दृष्टीने अापण काय उपाययाेजना करणार अाहात?
-पालिकेच्या बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी लोखंडी ग्रील बसविण्यात येतील. जेणेकरून नागरिक पुढे जाणार नाहीत.
{धाेकादायक ठिकाणी स्पष्ट सूचनाफलक का लावलेले नाहीत?
-सोमेश्वर, गंगापूर धरण परिसरात सूचनाफलक लावण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणे शक्य नसल्याने नागरिकांनीच याबाबत स्वत:हून खबरदारी घेतली पाहिजे.
{धोकादायक ठिकाणांना ‘नो सेल्फी झोन’ घाेषित का करत नाही?
-याबाबतच्या गोष्टी महापालिकेच्या अखत्यारीत येत नाहीत. याबाबत पोलिस प्रशासनाकडून निर्णय हाेऊन तेच घाेषित करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...