आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lady Committed Suicide Because Of Harrashment Of Company Colleague

कंपनीतील सहकार्‍यांच्या छळामुळे नाशकात युवतीची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘हिर्‍याला जितके पैलू नसतील, तितके पैलू मी पाडीन’ असे शेवटचे बोल बोलणार्‍या आणि सहकार्‍यांच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या प्रणाली रहाणे या तरुणीने मंगळवारी जगाचा निरोप घेतला. रविवारी गळफास घेतल्यानंतर रुग्णालयात दोन दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती.

प्रणाली अडीच वर्षांपासून बॉश कंपनीत टर्नर म्हणून काम करत होती. कंपनीमार्फत जूनमध्ये बंगळुरूला झालेल्या परीक्षेत तिने सुवर्ण पदक मिळविले होते. कॅल्क्युलस विषयाच्या परीक्षेतही ती अव्वल आली होती. या यशामुळेच सहकार्‍यांकडून दीड वर्षांपासून छळ होत असल्याचे तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे समोर आले. मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच अनेकांनी र्शेयस हॉस्पिटलकडे धाव घेतली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान, बॉश व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावरच अडविले. मात्र, अन्य प्रसार माध्यमांजवळ व्यवस्थापनाने संबंधित दोषींच्या चौकशीसाठी पाऊल उचलत कारवाईचे आश्वासन दिले.


आजारपणातही छळ
आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस अगोदर प्रणाली आजारी पडली होती. यामुळे वडिलांनी कंपनीत दूरध्वनी करून तिला आराम करायला लावला. दोन दिवसांनंतर प्रकृती ठीक नसतानाही ती कामावर गेली. मात्र, अशा अवस्थेतही तिच्या महिला सहकार्‍यांनी तिला, ‘ही जिवंत कशी आली,’ असे अपशब्द वापरले. यामुळे ते जिव्हारी लागल्यानेच हे पाऊल उचलल्याचे प्रणालीचे वडील प्रदीप यांनी सांगितले.


प्रशासनाने लक्षच दिले नाही
कंपनीत कर्मचार्‍यांच्या नातेवाइकांशिवाय इतर सामान्य लोकांना योग्य वागणूक दिली जात नाही. त्याचीच प्रणाली बळी ठरली. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती. नंदकुमार खांबेकर, प्रणालीचे मामा


आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दहा जणांना कोठडी
बॉश कंपनीतील प्रशिक्षणार्थी कामगार भूषण परदेशी, अभिजित भोर, विशाल कोरडे, अमित पवार, स्वप्नील सोनवणे, हर्षल पाटील, श्वेता शिंदे, तेजस्विनी बिरारी, शुभदा काजळे, नेहा सोनवणे यांच्याकडून प्रणालीची रॅँगिंग केली जात असल्याचे तिच्या पालकांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दहाही संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.


या मुद्यांवर कोठडी : प्रणालीने आत्महत्यापूर्वी चार मुलींसह दहा जणांची नावे चिठ्ठीत लिहून ठेवली आहेत. मात्र, ते कुठल्या प्रकारे तिला त्रास देत होते, त्याचा तपास आवश्यक असून, त्यासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील बैसाने यांनी केली होती. न्यायालयाने 7 तारखेपर्यंत कोठडी सुनावली.