आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आरोपीचा धावत्या रेल्वेतून पोलिसांना गुंगारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड - अनैतिक व्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पश्चिम बंगालमधील एका 40 वर्षीय महिलेला पोलिस रेल्वेतून तिच्या राहत्या घरी बंदोबस्तात घेऊन जात होते. त्यावेळी तिने स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा करत तेथून धावत्या गाडीतून उडी मारून पोबारा केला.


मुमताज काशा मुल्ला (वय 40) या महिलेसह अनैतिक व्यवसाय करणा-या चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. कोर्टाच्या आदेशाने या महिलांना त्यांच्या राहत्या गावी सोडून देण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. या महिला पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगण्यात आल्याने पोलिस त्यांना तेथे घेऊन जात होते. या चारपैकी दोन महिलांच्या घरचे पत्ते मिळाल्याने त्यांना तिथे नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु, इतर दोन महिलांनी चुकीचे पत्ते दिल्याने त्यांचे नातेवाईक तिथे मिळाले नाहीत.


अखेर पोलिस या दोन्हीही महिलांना पुन्हा मुंबई येथून ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून घेऊन परतत होते. मनमाड सोडल्यानंतर मुमताजने स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा केला. बराच वेळेनंतर मुमताज बाहेर न आल्याने पोलिसांना संशय आला. स्वच्छतागृहाच्या खिडकीला काच नसल्याने तिथून या आरोपीने धूम ठोकल्याची माहिती आहे.


पोलिस बंदोबस्तातही धावत्या रेल्वेतून या महिला आरोपीने पलायन कसे केले, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी फरार आरोपी मुमताजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.