आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासलगाव गट अनुसूचित जमातीकरिता राखीव झाल्याने मातब्बरांचा हिरमोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव - जिल्हा परिषदेचा लासलगाव गट हा अनुसूचित जमातीकरिता राखीव झाल्याने अनेक मातब्बरांची इच्छा यावेळी पूर्ण होणार नसल्याने आता ब-याच नेत्यांना पंचायत समितीवर आपल्याला समाधान मानावे लागणार आहे. लाल दिव्याचे स्वप्न आरक्षणाने नक्कीच पडणार नसले, तरी पंचायत समितीत जाण्याकरिता लासलगाव गण हा सर्वसाधारण असल्याने इच्छुकांनी जोरदार कंबर कसली असून, गटापेक्षा गणाचीच चर्चा जागोजागी सुरू आहे.
लासलगाव गट आरक्षित झाल्यामुळे सगळ््या बड्या नेत्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. लासलगाव गटात यंदा तरी चांगली रंगत पहायला मिळेल अशी आशा होती. मात्र, आरक्षण जाहीर झाल्यानंतर ती मावळली आहे. मात्र, आता आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्याच्या ‘सौं’ ना तिकीट कसे मिळेल याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वच नेत्यांकडून सुरू झाला आहे. लासलगाव हे येथे निफाड तालुक्यात मात्र, मतदारसंघ येवल्यात त्यामुळे ना. भुजबळांचा मतदार संघातील गट लासलगावला देखील काहीसे विशेष महत्त्व आहे. मात्र, सध्या लासलगाव गटाचे नेतृत्व शिवसेना करते आहे. शिवसेना निवडून येण्याकरिता शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटलांनी त्यावेळी परिश्रम घेतले होते. आता आरक्षण जरी असले तर कल्याणराव पाटील यांनी लासलगाव येथे शिवसेनेचा मेळावा घेऊन; लासलगावची जागा पुन्हा आपणाकडे ठेवायची आहे, याची झलक दाखवून दिली. पालकमंत्री छगन भुजबळ यांना देखील लासलगाव गट आपल्याकडे खेचायचा आहे. त्यामुळे तेही लासलगाववर विशेष लक्ष ठेवणार आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता कॉँगे्रस व राष्ट्रवादी कॉँगे्रस यांच्यात युती होणार का असा प्रश्न दोनही पक्षाच्या नेत्यांना पडलेला आहे. आघाडी झाली तर लासलगाव गटाची जागा कोणत्या पक्षाला जाते याकडेही मतदारराजाचे लक्ष आहे. लासलगाव हे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा यांचे गाव आहे. त्यामुळे ते आपल्या पक्षाचे उमेदवार लासलगाव येथे उभे करणार काय याकडेही लक्ष राहणार आहे. मनसेच्या अनेक इच्छुकांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे हे उगावचे आणि उगाव हे देखील लासलगाव गटात येते तसेच लासलगावचे नेतृत्व सध्या सरपंच नानासाहेब पाटील करीत आहेत.
मागील निवडणुकीत लासलगावचे दोन उमेदवार तर उगाव परिसरातील एक उमेदवार होता, त्यात लासलगावातील दोनही उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यंदा उमेदवार शोधताना नेत्यांना व स्थानिक कार्यकर्त्यांना योग्य असा निर्णय घ्यावा लागणार आहे. अनूसूचित जमातीकरता आरक्षण जाहीर झाल्यानंतर येथे अनेक नावांची केवळ चर्चा सुरू झाली असून, या चर्चेतून कुणाची लॉटरी लागणार हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र, अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच व्यक्ती नव्हे पक्ष असेच समीकरण राहणार आहे.
लासलगाव गटाकरिता राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सुरेखा गोधडे ,रोहिणी मोरे ,शिवसेनेकडून संजीवनी गांगुर्डे, सुशीला पवार तर कॉँगे्रस पक्षाकडून मंजू माळी, सुवर्णा पवार यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. गटाकरिता जी महिला उमेदवार असेल ती तर राजकारणात नवखी असणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सर्वसाधारण जागेवर जो पक्ष सक्षम उमेदवार देईल, त्याला गटही जिंकता येणे सोपे जाणार आहे. लासलगाव गण हा सर्वसाधारण झाल्याने
इच्छुकांची भलतीच गर्दी येथे आहे. लासलगाव गणात राष्ट्रवादीकडून बाजार समितीचे सभापती असलेले जयदत्त होळकर, दिलीप गायकवाड, मधुकर गावडे यांची तर शिवसेनेकडून शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील, टाकळी विंचूरचे उपसरपंच शिवा सुराशे, विद्यार्थी सेनेचे बालेश जाधव, बाळासाहेब जगताप यांच्या बरोबरच लासलगाव ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रशेखर होळकर यांच्याही नावाची चर्चा होत आहे.कॉँग्रेसकडून गुणवंत होळकर, डॉ. विकास चांदर, ज्ञानेश्वर पाटील यांची तर मनसेकडून रवींद्र होळकर यांची नावे बोलली जात आहेत. लासलगाव हे गाव गटातील सर्वात मोठे गाव असून, येथील मतदारांची संख्या सुमारे बारा हजार आहे. त्यामुळे लासलगाव कोणाला तारणार हे आता सांगणे कठीण आहे.