आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे हस्तक असून, नरेंद्र मोदींविरुद्ध बोलणारा ते एक चांगला बोलका 'पोपट' आहेत, अशी खरमरीत टीका लालू प्रसाद यादव यांनी आज नाशिक येथे केली.
लालू, त्यांची पत्नी राबडीदेवी व घरातील इतर सदस्य नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प योगाची शांती करण्यासाठी येथे आले होते. सकाळी त्र्यंबकेश्वर येथील शांतीपूजेचा कार्यक्रम आटोपून नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.
लालू म्हणाले, भाजप हा राष्टीय स्वयंसेवक संघाचा एक मुखवटा आहे. संघाच्या तालावर भाजपचे काम चालते. संघाने अडवानींना दूर करीत नरेंद्र मोदी यांना पुढे आणले आहे. हा उद्योग मागील काही महिन्यापासून सतत सुरु होता. मात्र पक्षातंर्गत विरोधानंतरही संघाच्या इशा-यावरुन मोदी यांची गोव्यात निवड करताच अडवानींनी मोदीविरुद्ध आवाज उठविला. आता अडवानींनी आपली तलवार म्यान केली असली तरी त्यांना पक्षात विशेष महत्त्व दिले जाणार नाही. भाजपकडे सध्या कोणतेही धोरण, विचारधारा नसून, लोकांच्या भावना भडकावून मते कशी मिळवता येतील यावर पक्षाने भर दिला आहे.
आज नितीशकुमार मोदींच्याविरोधात जे बोलत आहेत त्याचा बोलविता धनी अडवानी असल्याचा आरोप करीत नितीशकुमारांवर लालूंनी तोफ डागली. ते म्हणाले, गुजरातमध्ये 2002 मध्ये दंगली झाल्या त्यावेळी केंद्रात नितीशकुमार रेल्वेमंत्री होते. त्यावेळी रेल्वे पेटवल्यानेच अनेक लोक मारले गेले होते. त्यावेळी रेल्वेमंत्री या नात्याने नितीशकुमार यांनी कोणतेही चौकशी केली नाही. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असती तर सत्य बाहेर आले असते व मोदींची खुर्चीही तेव्हाच गेली असती. पण नितीशकुमारांना तसे काहीही करायचे नव्हते. या उलट रामविलास पासवान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला होता. नितीशकुमारांचा आजचा मोदीविरोध हा केवळ त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी आहे. त्यामुळे नितीशकुमारांचा मोदीविरोध खरा नसून त्याचा बोलविता धनी लालकृष्ण अडवानीच आहेत असा आरोप लालूंनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.