आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Land Acquisition Division,Latest News In Divya Marathi

कुंभमेळा भूसंपादनाच्या काही प्रस्तावांमध्ये होणार क्षेत्रदुरुस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यासाठी भूसंपादनाची काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मोजणी झाल्याने त्यातील काही प्रस्तावांमध्ये क्षेत्रदुरुस्ती करावी लागणार आहे. त्याचे प्रस्तावही भूसंपादन विभागाने पुन्हा संबंधित यंत्रणांना पाठविल्याने आता ही प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. साधुग्रामच्या जागेचा मुद्दा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. शिवाय, इतर कामे करण्यासाठीही तेथील भूसंपादनाचा विषय महत्त्वाचा आहे. त्यात शाही मार्गावरील एका ठिकाणी मोजणी विभागाने अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्याही क्षेत्राचा त्यात अंतर्भाव केल्याने त्याचे वाढीव पैसे महापालिकेकडून घेणे शक्य नाही. ही रक्कम वाढत असल्याने आता ज्या-ज्या प्रस्तावांमध्ये मोजणीची काही शंका अथवा दुरुस्तीस वाव आहे, त्यांचे अहवाल पुन्हा क्षेत्र दुरुस्तीला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या प्रस्तावांना मान्यताही मिळाली होती. त्यामुळे कामे त्वरित सुरू होण्याची शक्यता वाढली असताना काही ठिकाणी चुकीच्या मोजणीमुळे त्यांना ब्रेक लागला आहे. मात्र, या प्रकरणांसाठी महापालिकेकडून मोबदला शुल्क येणे अपेक्षित आहे. काही प्रकरणांत तर ते आलेही आहे; परंतु अनेक ठिकाणी त्याची कमी रक्कम किंवा काही भूसंपादनाच्या प्रस्तावांना ती मिळणे अपेक्षित आहे.
‘भूसंपादन’कडे 80 कोटी पडून : शहरातील भूसंपादनाच्या विविध 190 प्रकरणांत भूसंपादनासाठी महापालिकेने भूसंपादन विभागास जवळपास 80 कोटी रुपये दिले आहेत. परंतु, ते देताना प्रत्येक स्वतंत्र प्रस्तावाच्या नावाखालीच मिळाल्याने यातील बहुतांश प्रकरणांना निधी अपुरा, तर काहींना वळता करण्याची आवश्यकता आहे. सध्या सिंहस्थासाठी प्राधान्याच्या आठ प्रकरणांपैकी पाच प्रकरणांना अडचण नाही. त्यासाठी 50 ते 60 कोटी रुपये आवश्यक आहेत. परंतु, महापालिकेचा निधी याच प्रकरणांसाठी नसल्याने इतर प्रकरणांसाठी देण्यात आलेला परंतु अद्याप खर्च न झालेला निधी या प्राधान्याच्या प्रकरणांसाठी वळता करणे आवश्यक आहे. तो करण्यास अडचण नसल्याचेही भूसंपादन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गंगापूर एसटीपीसाठी 14 कोटींची मागणी
सिंहस्थासाठी गोदावरी प्रदूषणमुक्त होणे महत्त्वाचे असून, त्यासाठी मलनिस्सारण केंद्र उभारणी निकडीची आहे. त्या अनुषंगाने गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्र त्वरित सुरू होणे अनिवार्य आहे. मात्र, भूसंपादनासाठी 24 कोटी रुपयांची गरज भूसंपादन विभागास आवश्यक असून, त्यातील 14 कोटी रुपयांच्या मागणीसाठी संबंधित विभागाने पत्रही महापालिकेस सोमवारी दिले आहे. 10 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत .