आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभाषिकांना लँग्वेज गाइडची मदत, कुंभमेळ्यासाठी युवा मंचचे पाऊल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थात देशातील विविध भागातून बहुभाषिक लाेक सहभागी होतात. परंतु, त्यातील अनेकांना इंग्रजी हिंदी या दोन्हीही भाषा येत नाहीत. त्यांच्या स्थानिक भाषेत ते बाेलत असल्याने नाशिकमध्ये त्यांना संवाद साधण्यास अडचण येऊ शकते. ही बाब ओळखून ‘युवा मंच-प्रबोधनातून परिवर्तनाकडे’ या ग्रुपतर्फे "लॅग्वेज गाइड’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे. यात विविध भाषा येणाऱ्यांच्या मदतीने संवादातील भाषिक अडचणींवर मात करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र इ-मेल आयडी तयार करण्यात आला असून, कामास इच्छुक असणारे त्यावर आपली माहिती पाठवू शकतात.
दाक्षिणात्य राज्यांमधील भाषा नाशिककरांना समजणे अवघड असते. अशा नागरिकांना काही समस्या उद्भवल्यास भाषेच्या अडसरामुळे त्यांना ते सांगणेही कठीण होते. काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकरोडला तेलगू लोकांचा अपघात झाला होता. त्यांना मराठी येत नसल्याचा काही दलालांनी गैरफायदा घेतला होता. शिवाय मराठी, हिंदी वा इंग्रजी भाषेअभावी त्यांच्यावर उपचार करायलाही अडचणी येत होत्या. ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बरीचशी तेलगू भाषिक मंडळी जमा झाली त्यांनी मदत केली. असे प्रसंग कुंभमेळ्यात उद‌्भवू नयेत म्हणून युवा मंच लँग्वेज गाइडचा उपक्रम राबविणार आहे.

त्यात विविध भाषा अवगत असलेल्यांचा समूह तयार करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात ज्यांना काही अडचणी उद्भवतील त्यांनी किंवा आजूबाजूच्या काेणी या समूहातील प्रतिनिधीला संपर्क साधल्यास तो तातडीने त्याच्यापर्यंत पाेहचेल किंवा त्यांच्याशी संवाद साधून आजूबाजूच्या व्यक्तींना त्यांच्या भावना पाेहचविल्या जातील.
या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास nscnashik@redimail. com या मेल आयडीवर आपले नाव, पत्ता, अवगत भाषा, मोबाइल क्रमांक इत्यादी माहिती पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढाकार घ्यावा
- परप्रांतीय भाविकांच्या अडचणी समजून घेतानाच प्रशासनाचा भार काही प्रमाणात कमी करण्यासाठी आम्ही सिंहस्थात हा उपक्रम राबविणार आहोत. यात वेगवेगळ्या भाषा येणाऱ्यांनी सहभागी व्हावे.
भूषण काळे, पदाधिकारी, युवा मंच
बातम्या आणखी आहेत...