नाशिक - एरवी स्वत:चे किंवा फार तर आई-वडिलांचे अवयव मृत्यूनंतर दान करणे तसे समाजासाठी नवे नाही. पण काळजाचा तुकडा असलेल्या 13 वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर प्रचंड दु:खाघात झालेल्या आई-वडिलांनी त्यातून सावरत गरजूंना त्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी दान देण्याचा निर्णय घेणे तसे दुर्मिळच! आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वरिष्ठ सहायक युवराज भारंबे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलगा अपूर्वच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचे डोळे आणि किडनी दान करून मानवतेचा नवा आदर्श घालून दिला.
झाडावरून पडला आणि...
गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगर येथील भारंबे यांचा मुलगा अपूर्व 1 मे रोजी परीक्षेचा निकाल लागल्याच्या आनंदात निर्मला कॉन्व्हेंटशेजारील उद्यानात खेळायला गेला. तेथे जांभळाच्या झाडावरून पडल्याने त्याच्या यकृताला मार लागला. हृषीकेश हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वाचवण्यासाठी दोन दिवस प्रयत्न केले. पण तो वाचू शकला नाही.
आभाळ कोसळले
नववीत गेलेला मुलगा आकस्मिक गेल्याने ते दु:ख जन्मदात्यांना सहन होण्यापलीकडचे होते. मात्र, या काळजाच्यात तुकड्याची आठवण प्रत्यक्ष रूपात जिवंत राहावी म्हणून आई कविता आणि वडील युवराज यांनी काळजावर दगड ठेवत अपूर्वचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्याचे दोन्ही डोळे आणि एक किडनी उपयोगी असल्याने दान करण्यात आले.
...तो सदैव आपल्यातच राहील!
खाऊ असो अथवा वस्तू, त्या वाटून घेण्याचा व एकमेकांना देण्याचा अपूर्वचा स्वभाव होता. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या माध्यमातून दोघांना हे जग पाहता येईल. एका व्यक्तीला किडनीच्या माध्यमातून आयुष्य आनंदाने जगता येईल. - युवराज भारंबे, मृत अपूर्र्वचे वडील