आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅनकार्ड क्लबचे व्यवहार सुरळीत, सेबीच्या निर्बंधांबाबत दोन दिवसांत स्थिती स्पष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पॅनकार्ड क्लबच्या ‘डिव्हाइन हॉलिडे स्कीम’ या योजनेवर सेबीने निर्बंध घातले असले तरी कंपनीचे नाशिकच्या कार्यालयातील व्यवहार सुरळीत सुरु आहेत. कंपनीने ग्राहकांची कसलीही फसवणूक केलेली नाही. निर्बंध टाकलेल्या योजनेबाबत कायदेशीर कारवाई सुरू असून दोन दिवसात याची माहिती मिळणार असल्याचे कंपनीच्या विकास व्यवस्थापकांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

पॅनकार्ड क्लब कंपनीची ‘डिव्हाइन हॉलीडे स्कीम’ ही योजना संचय गुंतवणूक योजनेत मोडते. तरीही कंपनीने प्रमाणपत्र न घेताच योजना सुरु ठेवली. या योजनेव्दारे गुंतवणूकदारांकडून 31 हजार कोटी रुपये गोळा केले आहेत. यापुढे कंपनीला गंतवणूकदारांकडून पैसे घेता येणार नसल्याचे निर्बंध त्यांच्यावर ‘सेबी’कडून टाकण्यात आले आहेत. दरम्यान, या संदर्भात कंपनीच्या विकास व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता पॅनकार्ड क्लबचे नाशिकसह देशातील सर्वच कार्यालयात व्यवहार सुरळीत असून कंपनीच्या कायदेशीर विभागाकडून सेबीने टाकलेल्या निर्बंधाबात आव्हान दिले आहे. दोन दिवसात हे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.
अशी आहे ‘डिव्हाइन हॉलिडे स्कीम’ : कंपनीची राज्यासह देशाच्या विविध भागांमध्ये रिसॉर्ट आहेत. त्यात ग्राहकांकडून ‘डिव्हाइन हॉलीडे स्कीम’च्या माध्यमातून 900 रुपयांप्रमाणे आगाऊ रूमची बुकिंग केली जाते. ती साडेतीन, सहा व नऊ वर्ष अशा कालावधीसाठी असून जे ग्राहक रुमचा वापर करत नाहीत, अशा ग्राहकांना सरेंडर व्हॅल्यू म्हणून परतावा दिला जातो. याबाबतचे हमीपत्र कंपनीकडून ग्राहकास दिले जाते त्यास सेबीने हरकत घेतली आहे.