आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lathi Charge In India Security Press, Two Worker Injured

इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये लाठीचार्ज, दोन कामगार जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कामगारांची अंगझडती घेण्यावरून शुक्रवारी झालेल्या वादात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी कामगारांवर लाठीचार्ज केला. त्यात दोन कामगार जखमी झाले. संतप्त कामगारांनी दलाचे कमांडर रोहित अश्विनकुमार यांची बदली करण्याच्या मागणीसाठी रात्रपाळीत इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेसमध्ये कामबंद आंदोलन सुरू केले. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते.


इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या प्रवेशद्वारालगत शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अंगझडतीबाबतच्या तक्रारीनंतर मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी महाप्रबंधक टी. आर. गौडा यांच्याशी चर्चा करण्यास गेले असता झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर कामगारांवर हल्लाबोल झाला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन्ही प्रेसमध्ये व मुख्यालयात राखीव असलेले सर्व जवान शस्त्रास्त्रांसह टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये भरून आणले. या जवानांनी प्रवेशद्वारासमोर उभे राहून शिवीगाळ करत दहशत निर्माण केली तसेच कामगार प्रतिनिधी बाहेर येताच त्यांच्यावर तुटून पडण्याची भाषा केली. यामुळे प्रवेशव्दारावर तणाव निर्माण होताच त्यांच्यातील एक-दोन जवानांनी सामंजस्याची भूमिका घेत इतरांना शांत करण्याचे आवाहन केले. कामगार प्रतिनिधी रात्री उशिरापर्यंत प्रेसमधून बाहेरच पडले नसल्याने संघर्ष टळला.

कामगार नेत्यांनी सांगितले की, दलाचे कमांडर रोहित अश्विनकुमार यांच्या आदेशानुसार सुटीच्या वेळी जवानांनी कामगारांची चुकीच्या पद्धतीने अंगझडती घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे रांगेत कामगारांची संख्या वाढत जाऊन असंतोष वाढला. कामगारांनी मजदूर संघाच्या नेत्यांकडे तक्रार केल्यानंतर कार्याध्यक्ष जगदीश गोडसे, महाप्रबंधक टी. आर. गौडा यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. तेथे उपस्थित कमांडर अश्विनकुमार यांनी त्यांच्या जवानांना चुकीचे आदेश देऊन वातावरण तणावपूर्ण करून कामगारांवर लाठीचार्ज केला. त्यात दत्तू गवळी व बळवंत आरोटे हे कामगार जखमी झाले.
उशिरापर्यंत मीटिंग

कामगार मागणीवर आडून बसल्याने महाप्रबंधक टी. आर. गौडा, उपमहाप्रबंधक आर. एस. मोटवाणी, वर्क्‍स मॅनेजर सुनील तिवारी, सुनील दुपाहारे यांची बैठक सुरू होती. व्यवस्थापनाने सर्व प्रकार दिल्ली मुख्यालयास कळविल्यानंतर उशिरापर्यंत निर्णयाची वाट बघितली जात होती.

कामगारांचे धरणे
कामगारांवर लाठीचार्जचा आदेश देणार्‍या कमांडर रोहित अश्विनकुमार यांची बदली करण्याच्या मागणीसाठी महाप्रबंधक टी. आर. गौडा यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालण्यात आला तसेच जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व कामगार प्रतिनिधी महाप्रबंधकांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसले


दहा वर्षांपासून अंगझडती
मागील दहा वर्षांपासून व्यवस्थापनाच्या सहमतीने नियमानुसार कामगार झडती देत आहे. कधीच कामगारांकडे काहीच मिळाले नाही. झडतीसाठी कामगारांना वेठीस धरण्याची आवश्यकता नव्हती. माधवराव लहांगे, कामगार प्रतिनिधी


चलन छपाई बंद
कामगारांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांच्या आदेशान्वये इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेसमध्ये रात्रपाळीत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. त्यामुळे करन्सीत चलन छपाई तर इंडिया सिक्युरिटीमध्ये पासपोर्टसह महत्त्वपूर्ण स्टॅम्प, कागदपत्र छपाईचे काम शुक्रवारी सुरूझाले नाही व रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.