आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोगी आयुष्यासाठी हास्ययोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक - सायंकाळची वेळ. हिरवळीची मैदाने आणि एकच हास्यकल्लोळ. ‘लई भारी, लई भारी, लई भारी‘ ‘व्हेरी गुड, व्हेरी गुड’ असे म्हणत उत्साहात हसत भरारी घेणारे हास्य क्लबचे सदस्य असणारे ज्येष्ठ नागरिक.. जागतिक हास्य दिनानिमित्त जिल्हा हास्य समन्वय समिती द्वारका हास्य क्लब विभागातर्फे हॉटेल नंदिनी, नाशिक्लब येथे कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात हास्ययोगामुळे आरोग्यावर होणार्‍या फायद्याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी ताणतणावविरहित जीवन जगण्यासाठी ‘ना औषध, ना गोळ्या, फक्त हसा आणि वाजवा टाळ्या’ असा संदेश देण्यात आला.

जागतिक हास्य दिनानिमित्त हॉटेल नंदिनी, नाशिक्लब येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सारडा अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचे अध्यक्ष रामेश्वर सारडा, नगरसेविका अर्चना थोरात, महाराष्ट्र हास्ययोग समिती डॉ. सुषमा दुगड, नाशिक जिल्हा हास्य समन्वय समिती अध्यक्ष अदिती वाघमारे, अ‍ॅड. वसंतराव पेखळे, डॉ. सुरेश सूर्यवंशी, अश्विनी धोपावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ‘हा.. हा.. हा...., हो... हो.. हो...’ अशा क्लबच्या सदस्यांच्या हास्यकल्लोळाने वेगळीच रंगत आली.

आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी आयुष्य जपण्यासाठी हास्ययोगाचा अवलंब करणे गरजेचे आहे. हास्ययोगाला सुरुवातीच्या काळात महत्त्व दिले जात नव्हते. मात्र, सध्या ही परिस्थिती बदलली असून, याचाच अनुभव हास्य क्लबच्या वाढणार्‍या संख्येतून समोर येत आहे. या कार्यक्रमात आदिती वाघमारे यांच्या ‘हास्ययोगा’ या अनुवादित पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

तसेच यावेळी हास्य क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यानंतर डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी हृदयरोगाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राहुल कुमार यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील विविध हास्य क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काठे गल्लीतून हास्य रॅली
रविवारीसकाळी जिल्हा हास्य समन्वय समिती द्वारका हास्य क्लब विभागातर्फे काठे गल्ली सिग्नल परिसरातून हास्य रॅली काढली. जोकर, नेत्यांच्या विविध वेशभूषांनी लक्ष वेधून घेतले. माणेकशानगर येथील लोकमान्य सभाग़ृहात या रॅलीचा समारोप झाला. यावेळी नगरसेवक सचिन मराठे, नगरसेविका अर्चना थोरात या रॅलीत सहभागी झाले होते.