आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर लावणीच्या कार्यक्रमांवरच बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांनी कधीही धुडगूस घातला नाही; मग विशिष्ट कार्यक्रमांनाच प्रेक्षकवर्ग का चेकाळतो, असा सवाल करीत अशा कार्यक्रमांवरच बंदी घालण्याचा इशारा स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांनी दिला आहे. तर, सायंकाळच्या शोमध्ये मोठय़ा प्रमाणात धुडगूस घातला जात असल्याचे लक्षात आल्याने हा शोच बंद करून यापुढे दुपारी 12 किंवा 3 वाजेच्याच शोला परवानगी दिली जाईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

महाकवी कालिदास कलामंदिरात लावणीच्या कार्यक्रमाच्या नावाने घातला जाणार्‍या हैदोसवर ‘दिव्य मराठी’ काही दिवसांपासून प्रकाशझोत टाकत आहे. सभागृहात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी लावणीच्याच कार्यक्रमात शनिवारी काही प्रेक्षकांनी चक्क रंगमंचावर घुसखोरी करून कलाकारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. यावेळी तातडीने सुरक्षारक्षक धावून आल्यामुळे सुदैवाने गैरप्रकार टळला. परंतु, भविष्यात यापेक्षाही गंभीर प्रकार होण्याची भीती या घटनेनंतर व्यक्त होत आहे. घडल्या प्रकाराबाबत स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, लावणीच्या नावाने चालणारा धुडगूस आम्ही कधीही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सुरेखा पुणेकर यांचे लावणीचे कार्यक्रम महिलावर्गामध्येही प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासारख्या अन्य नामवंत कलावंतांनाही प्रेक्षकांकडून तसाच मान दिला जातो. मग काही विशिष्ट कार्यक्रमांनाच सभागृहात धुडगूस का घातला जातो, असा प्रश्नही धोंगडे यांनी केला. यापुढे अशा प्रकारचे कृत्य पुन्हा आढळल्यास असल्या कार्यक्रमांवरच बंदी घालण्याचा विचार करू, असे धोंगडे म्हणाले.

कंत्राटदारच देईल पोलिसांचा खर्च
लावणीच्या कार्यक्रमात रात्रीच्या वेळी धुडगूस घातला जातो म्हणून रात्री 9 वाजेचा शो बंद करण्यात आला होता. यापुढे 6 वाजेचा शो बंद करण्यात येईल, अशी माहिती कालिदास कलामंदिराचे प्रमुख तथा अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी दिली. यापुढे दुपारी 12 आणि 3 वाजेच्याच लावणीच्या शोला परवानगी दिली जाईल, असे सांगत पवार म्हणाले की, कार्यक्रमातील धुडगूस थांबविण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने स्वखर्चाने पोलिसांची नियुक्ती करावी, असे आदेशित करण्यात येईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीत, अशी व्यवस्था केली जाईल. कार्यक्रमाच्या मध्यंतरात दारूच्या बाटल्या सभागृहात आणल्या जात असल्याची चर्चा असल्याने अशा कार्यक्रमांना मध्यंतरच न ठेवण्याचा विचार करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.