आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LBT Close Issue At Nashik City Public Harassment

बंदमुळे ग्राहकांचे हाल; ना‍शिक शहरात 100 कोटींचे व्यवहार ठप्प

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- 'एलबीटी' (स्थानिक संस्था कर) विरोधात शहरातील व्यापार्‍यांच्या बेमुदत बंदला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील प्रमुख व्यापारी पेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे मात्र हाल झाले.

मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, सराफ बाजार, बोहरपट्टी, पंचवटी आदी प्रमुख व्यापारीपेठा कडकडीत बंद राहिल्याने आणि लग्नसराई सुरू असल्याने किमान 100 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज नाशिक व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी व्यक्त केला. बंदमध्ये शहरातील विविध 33 व्यापारी संघटना आणि किमान 15 हजार लहान-मोठय़ा व्यापार्‍यांनी सहभाग नोंदविला.

महासंघाच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलनाला रविवार कारंजा येथील सिद्धिविनायकाच्या आरतीने सुरुवात झाली. त्यानंतर रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, शिवाजीरोड, मध्यवर्ती बसस्थानक या रस्त्याने व्यापार्‍यांनी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. येथे अपर जिल्हाधिकारी आणि प्रभारी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजन दलवानी, विजय कुलकर्णी, अरुण जातेगावकर, राहुल डागा, अशोक करंदीकर, मदन पारेख, अशोक कापडिया, प्रवीण चोरडिया, सतीश अग्रवाल आदींनी केले.

नाशिकरोडला संमिर्श प्रतिसाद : नाशिकरोड देवळाली र्मचंट असोसिएशन, जेलरोड व्यापारी संघटना यांचा बंदमध्ये सहभाग होता. व्यापार्‍यांनी मोटारसायकल व पायी रॅली काढून बंदचे आवाहन केले.

'भाजप' शायनिंग
व्यापार्‍यांच्या आंदोलनाला थेट पाठिंबा देत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. उपमहापौर सतीश कुलकर्णी, माजी उपमहापौर देवयानी फरांदे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, नगरसेविका सीमा हिरे आदी नेत्यांनी सीबीएस चौकापर्यंत साथ दिली. त्यानंतर मात्र, हे नेते आंदोलनातून गायब झाल्याने त्यांची उपस्थिती पाठिंब्यासाठी होती की प्रसिद्धीसाठी अशी चर्चा व्यापार्‍यांत सुरू होती.

ग्राहकांचे हाल
लग्नसराई सुरू असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून कपड्यांचा बस्ता आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या ग्राहकांना दुकाने बंद बघून धक्काच बसला. अनेकांनी बस्त्याकरिता तारखांचे पूर्वनियोजन केलेले असते. त्यानुसार, नातेवाइकांची जमवाजमव ठरलेल्या दुकानांत होत असते. आज दिवसभर अनेक दुकानांपुढे बस्ता कुठे करायचा, या विवंचनेत वधू-वर पिता सापडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सराफ असोसिएशनचा पाठिंबा
नाशिक सराफ असोसिएशनने व्यापार्‍यांच्या बंदला पूर्ण पाठिंबा देत गुरुवारी सराफी पेढय़ा बंद ठेवल्या. बेमुदत बंदबाबत काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय घेण्यासाठी असोसिएशनची बैठक शुक्रवारी सकाळी होणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी सांगितले.

उद्योगही आंदोलनात
महाउद्योग मित्र आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, लघुउद्योग भारतीचे सतीश सिरोंजकर, भाजप उद्योग आघाडीचे पदाधिकारी, कसमादे उद्योग संघाचे अध्यक्ष तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लघुउद्योजकांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने उद्योजकांतही एलबीटीवरून फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

येथे दुकाने सुरू
पेठरोड, इंदिरानगर, सातपूर, सिडको, नाशिकरोड यांसारख्या उपनगरांत अनेक दुकाने सुरू राहिल्याने बंदचा परिणाम मुख्य बाजारपेठांतच जाणवला.

आज नाशिकरोडला रॅली
नाशिकरोडला शुक्रवारी सकाळी 9 वाजता रॅलीचे आयोजन महासंघाच्या वतीने करण्यात येणार आहे. अनुराधा थिएटरजवळील दुर्गा मंदिर येथून ही रॅली निघणार असून, ह्यएलबीटीह्णविरोधी बंद का? एलबीटीमुळे ग्राहकांचे नुकसान काय? याबाबत व्यापारी व ग्राहकांची जनजागृती केली जाणार आहे.