आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटी विवरणपत्रास 29 जूनपर्यंतच मुदत; 29 हजार व्यापार्‍यावर दंडात्मक कारवाईचे संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -एलबीटीविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले असतानाच नियमानुसार वार्षिक विवरणपत्र दाखल न केल्यामुळे महापालिकेने आता 29 हजार व्यापार्‍यांना 29 जून ही अखेरची मुदत दिली आहे. या मुदतीत विवरणपत्र दाखल न करणार्‍यांवर पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली जाणार असून, त्यानंतर त्यावर 3 टक्क्यांपर्यंत व्याजदरही आकारला जाणार आहे.
आयकरप्रमाणे एलबीटीसाठी नोंदणी केलेल्या व्यापार्‍यांनाही वार्षिक विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विवरणपत्रात खरेदी-विक्री केलेल्या मालासंदर्भातील माहितीही नमूद करावी लागते. दरम्यान, विवरणपत्र दाखल करण्यासाठी व्यापारी उदासीन असल्याचे चित्र होते. व्यापारी संघटनांच्या मताप्रमाणे त्याबाबतचा अर्जही क्लिष्ट व अस्पष्ट असल्याचा आक्षेप होता. पालिकेकडे 29 हजार 500 व्यापारी नोंदणीकृत असताना प्रत्यक्षात 300 व्यापार्‍यांनीच विवरणपत्र भरले होते. त्यामुळे एलबीटी विभागाने 29 जून रोजीची अंतिम मुदत देत त्यानंतर पाच हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, विवरणपत्र सादर न करणार्‍या व्यापार्‍यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याबरोबरच दोन वर्षे कारावासाची शिक्षाही ठोठावण्याचे अधिकार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
एलबीटी विरोधात राज्यभरातील व्यापार्‍यांनी विरोधाची भूमिका घेतली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत या प्रश्नावर सत्ताधार्‍यांना घेरण्याचा व्यापारी संघटनांचा प्रयत्न आहे.

एलबीटीला होणार्‍या विरोधाची धग सत्ताधारी पक्षाला जाणवावी, यासाठी व्यापारी संघटनांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत एलबीटीविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा याधीच सरकारला दिला आहे. एकीकडे अशी सर्व तयारी सुरू असतानाच महापालिकेकडून एलबीटी कराचे संकलन होत नसल्याने व्यापार्‍यांना विवरणपत्र भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. आयकराप्रमाणे व्यापार्‍यांना एलबीटीसाठी विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे. नाशिक महापालिकेमध्ये याआधी जकात कराची वसुली खासगीकरणाच्या माध्यमातून होत होती. त्यामुळे होणार्‍या जाचाला कंटाळून व्यापार्‍यांनी आंदोलन केले होेते. त्यानंतर एलबीटी कर लागू करण्यात आला. परंतु, या करातील जाचक बाबींमुळे व्यापारी वैतागले असून, त्यास मोठा विरोध होऊ लागल्याने व त्याविरोधात मोठे आंदोलन झाल्याने मध्यंतरी राज्य शासनाने राज्यातील महापालिकांना याबाबत योग्य पर्याय सुचविण्यास सांगितले होते. त्यानुसार, प्राप्त अहवालानंतर मुख्यमंत्र्यांनी विक्रीकर विभागाद्वारे एलबीटी वसुलीचा पर्याय सुुचविला. मात्र, त्यासही व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

सुटीच्या दिवशीही काम राहणार सुरू
29 जून रोजी रविवार असून, त्यापूर्वी चौथा शनिवार असल्यामुळे सलग दोन दिवस सुटी येणार आहे. त्यानंतरही एलबीटी विभाग सुरूच राहणार असून, व्यापार्‍यांना विवरणपत्रे भरता यावी, यासाठी सुटीच्या दिवशी कामकाज सुरू राहील, असे उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सांगितले. जास्तीत जास्त व्यापार्‍यांनी विहित मुदतीत विवरणपत्रे सादर करावीत, असेही आवाहन त्यांनी केले.