आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेंबर ऑफ कॉर्मसच्या निवडणुकीत ‘एलबीटी इफेक्ट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपद निवडणुकीवरही एलबीटीचा परिणाम झाला आहे. एलबीटीची पाठराखण करण्याच्या चेंबरच्या भूमिकेविरोधात जाऊन मतपत्रिकांवरच थेट ‘नो एलबीटी’चे शेरे मारले जात असून, चेंबरला भावना पोहोचविल्या जात आहेत.

वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी शंतनू भडकमकर आणि पोपटशेठ ओसवाल उमेदवारी करीत आहेत. राज्यभरातील चेंबरचे सदस्य या मतदान करणार असून, उत्तर महाराष्ट्रातील जवळपास 650 सदस्यांचा त्यात समावेश आहे. शहरात जवळपास 400 सदस्य असून, त्यांना मतपत्रिकाही पोहोचल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी चेंबरचा राजीनामा दिल्याच्या घोषणा करणार्‍या व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींनाही मतदानपत्रिका पोहोचल्या असून, त्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी मतदान न करता मतपत्रिकेवर ‘नो एलबीटी’ असे शेरे मारून त्या पाठविल्या आहेत.

यामुळे आश्चर्य : चेंबरने जकातीला प्रदीर्घ काळ विरोध करीत पर्यायी करप्रणाली देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. दरम्यान, चेंबर मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्यासारखे बोलत असून, चेंबरकडून एलबीटीची पाठराखण केली जात असल्याने किरकोळ आणि ठोक व्यापार्‍यांच्या काही संघटनांनी चेंबरचे राजीनामे दिल्याचे दोन महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते; मात्र या सदस्यांना मतपत्रिका पोहोचल्याने ते अजूनही चेंबरमध्येच असल्याचे सिद्ध झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


.ते चेंबरमध्ये का?
‘नो एलबीटी’ शेरा मारणारे चेंबरच्या कार्यकारिणीवर आजही आहेत. त्यांनी सदस्यत्वाचे राजीनामे का दिले नाहीत? आम्ही नेहमीच व्यापार्‍यांचे प्रतिनिधित्व करीत असून, एलबीटीत काय काय बदल करता येतील, याकरिता प्रयत्न करीत आहोत. संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष, चेंबर

संदेश पोहोचविला
चेंबरच्या कार्यकारिणीवर नाशिक व्यापारी महासंघाचे जवळपास शंभर सभासद आहेत. या मतपत्रिकेत ‘नो एलबीटी’ हा शेरा मारून चेंबरकडे आम्ही आमचा संदेश कळवित आहोत. कोणालाही विरोध केलेला नाही. प्रफुल्ल संचेती, कार्याध्यक्ष, नाशिक व्यापारी महासंघ