आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज व उद्या व्यापार बंद; एलबीटी विरोधात बंदमुळे सामान्यांचे होणार हाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करा, या मागणीसाठी सोमवार(दि. 15)पासून व्यापार्‍यांचे दोन दिवसांचे ‘व्यापार बंद’ आंदोलन सुरू होत आहे. या आंदोलनात किरकोळ व ठोक किराणा व्यापार्‍यांसह पेट्रोलपंप चालकही सहभागी झालेले असल्याने सर्वसामान्यांचे हाल होणार असून, बाजारपेठांतील दैनंदिन चारशे कोटींची उलाढालही थंडावणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. दरम्यान, सकाळी 10 वाजता मोठय़ा संख्येने व्यापारी रविवार कारंजा येथे जमून राज्य सरकारचा निषेध करणार आहेत.

या आंदोलनात महापालिका हद्दीतील किरकोळ आणि ठोक विक्रेते, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल दुकाने, हार्डवेअर्स, चायनीज मोबाइल आणि वस्तूंची दुकाने बंद राहणार असल्याचे फामचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तीन कंपन्यांचे 80 पेट्रोलपंप सोमवारी सकाळपासून बुधवारी सकाळपर्यंत बंद राहणार असल्याने इंधनपुरवठा ठप्प होणार आहे. या सर्व व्यवसायांतून किमान चारशे कोटींची उलाढाल दैनंदिन होते, ती ठप्प होणार आहे. दुसरीकडे, औषध विक्र ीची दुकाने उघडी राहणार असल्याचे केमिस्ट असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

नाशिकरोडला सराफ बाजार आजपासून बंद : एलबीटी विरोधातील बंदमध्ये नाशिकरोड सराफ असोसिएशनने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि. 15) व मंगळवारी (दि. 16) सराफी पेढय़ा बंद राहाणार असल्याची माहिती असोसिएशनचे मिलिंद दंडे व सरचिटणीस राहुल महाले यांनी दिली

दरम्यान, पेट्रोलपंप चालक या बंदमध्ये उतरल्याने शहर परिसरातील पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांनी रविवारी दुपारपासूनच गर्दी केली होती.

विधिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन
सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या आंदोलनाद्वारे राज्य शासनाचे लक्ष एलबीटी रद्द करण्याच्या विषयाकडे वेधले जाणार आहे. त्याकरिता राज्यपातळीवरील अनेक व्यापारी नेत्यांनी रविवारी मुंबईतील मनोरा आणि आकाशवाणी या दोन्ही आमदार निवासस्थानी जाऊन विधिमंडळ सदस्यांची भेट घेत सभागृहात एलबीटी रद्द करण्यासाठी बाजू मांडावी, असे आवाहन केले. राज्यातील जवळपास सर्वच शहरांतून आंदोलनाची हाक ‘फाम’ या व्यापारी संघटनेने दिली आहे.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसचा या आंदोलनात सहभाग नाही.

वापरा हे पर्याय
किराणा, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीकरिता ग्राहकांना शहरातील मॉल्सचा पर्याय उपलब्ध आहे. पेट्रोल-डिझेलकरिता मात्र वरील तीन कंपन्यांव्यतिरिक्तचे शहरातील पंप आणि पालिका हद्दीबाहेरील पंपांवरही पेट्रोल घेऊ शकता.

यामुळे व्यापार्‍यांचा विरोध
एलबीटी लागू झाल्यानंतर व्यापार्‍यांना अधिकार्‍यांचा जाच सहन करावा लागत आहे. ‘लायसन्स राज’ या करप्रणालीमुळे कायद्यातील अनेक तरतुदी बदलण्यात आल्या, शुद्धिपत्रकेही काढण्यात आली आहेत. याचाच अर्थ हा कायदा सदोष असून, तो अपूर्ण असतानाही त्याची सक्ती केली जात आहे. कर भरण्यास आमची हरकत नाही; मात्र तो संकलित करण्याची पद्धती योग्य हवी. सरसकट मूल्यवर्धित करातून एक टक्का वसूल केला जावा, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात येत आहे. महापालिकांच्या आर्थिक स्थितीवरही एलबीटीमुळे परिणाम होत असून, व्यापार आणि शहरविकास धोक्यात आला असल्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जात असल्याचे नाशिक व्यापारी महासंघाने म्हटले आहे.