आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आप’सह भाजप, डावी आघाडी व्यापार्‍यांसोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जो पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) हटविण्याची लेखी हमी देईल, त्यालाच व्यापारी आगामी निवडणुकीत मत देणार आहेत. एलबीटी न हटविल्यास सत्ताधार्‍यांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवू, अशी प्रतिज्ञा राज्यातील व्यापार्‍यांनी घेतल्यानंतर आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे.

महिनाभरापूर्वीच आम आदमी पक्षाने लेखी आश्वासन देत व्यापार्‍यांना पाठिंबा दिला होता, त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष आणि डाव्या आघाडीनेही व्यापार्‍यांना सत्तेत आल्यास एलबीटी हटविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला त्याच वेळी जकात रद्द करण्याचा शब्द सरकारने व्यापार्‍यांना दिला होता. 17 हजार कोटींचा महसूल पहिल्या वर्षी देणार्‍या या कराची वसुली सध्या 70 हजार कोटींवर गेली असली, तरी सरकारने जकात काढताना स्थानिक स्वराज्य संस्था कर हा नवा कर लादल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

आता नाही तर कधीच नाही
एलबीटीबाबत आता नाही तर कधीच नाही अशी स्थिती असून, व्यापार्‍यांनी 21 फेब्रुवारीचा बंद यशस्वी करून हजारोंच्या संख्येने मुंबईत आझाद मैदानावरील सभेत सहभागी व्हावे. याकरिता आपापल्या व्यावसायाशी निगडित संघटनांशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक महानगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजन दलवानी यांनी केले आहे.

गडकरीही करणार चर्चा
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी 22 फेब्रुवारी रोजी नाशिक दौर्‍यावर येत आहेत. भाजपकडून आम्हाला गडकरी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आमंत्रण आले असून, आम्ही त्यांना भेटणार आहोत. - प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष, फाम

सत्ताधार्‍यांना इशारा देण्यासाठी सभा
‘एलबीटी हटवा, अन्यथा येत्या निवडणुकीत तुम्हाला हटवू’, असा इशारा देण्याकरिता 21 फेब्रुवारी रोजी सरकारला इशारा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर व्यापार्‍यांची महासभा होणार आहे. या दिवशी राज्यभरातील व्यापार्‍यांनी बंदही पुकारला असून, सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. यानंतरही कर रद्द झाला नाही, तर मात्र व्यापारी कॉँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणार नाहीत व ज्यांच्यावर या कराचा बोजा पडतो आहे, त्या सर्वसामान्य ग्राहकांनाही सत्ताधार्‍यांना मतदान करू नका, असा प्रचार दुकानांतून करणार आहेत.