आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी वसुलीसाठी व्यापार्‍यांवर धाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थानिक संस्था कराची (एलबीटी) वसुली वाढवण्याच्या हेतूने महापालिकेने आता व्यावसायिकांवर कारवाईचे हत्यार उगारले आहे. दप्तराबाबत संशय असलेल्या दुकानांत बिले तपासणी करत दप्तर ताब्यात घेण्याची मोहीमच उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सुरू केली. बुधवारी रविवार कारंजा परिसरात उपायुक्त फडोळ यांच्यासह सहायक उपायुक्त आनंद जंत्रे व सहकार्‍यांनी कारवाई केली.

एलबीटी सुरू होऊन पाच महिने झाल्यानंतरही अनेकांनी कर भरलेला नाही. काही व्यापारी खोट्या बिलांचा आधार घेत असल्याचे लक्षात आल्याने ही कारवाई होत आहे. आतापर्यंत 218 व्यावसायिकांवर कारवाई करत 28 लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे. त्यानंतर दप्तर तपासणीची ही कारवाई सुरू करण्यात आली असून, ती गुरुवारपासून वेगाने करण्यात येणार असल्याचे उपायुक्त फडोळ यांनी सांगितले.

कलम 152 अन्वये कारवाई : मुंबई प्रांतिक अधिनियम 1949 च्या कलम 152 प्रमाणे ही कारवाई होत आहे. दोषी आढळल्यास दुकानातील मालतपासणी, झडती, बिले ताब्यात घेणे, जप्ती करणे किंवा दोन वर्षे कारावास अशा प्रकारच्या शिक्षेचाही अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आला असल्याचे फडोळ यांनी स्पष्ट केले.

काय आढळले कारवाईत : व्यापार्‍यांकडे वहीच्या कागदावर लिहिलेली बिले आढळली. त्याची छाननी गुरुवारी करण्यात येणार असून, कारवाई केली जाणार आहे.