आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीच्या कठड्यावर येताच जाळी तोडून बिबट्याची धूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- रात्रभर एका विहिरीत अडकलेल्या बिबट्याला जिवंत बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. जाळीत अडकवून त्याला दाेरीच्या साह्याने विहिरीच्या कठड्यापर्यंत वर काढण्यात यशही अाले. मात्र बेशुद्ध करण्यासाठी बिबट्याला मारण्यात येणाऱ्या इंजेक्शन गनचा नेम चुकला अन‌् हीच संधी साधून चपळ बिबट्याने जाळी ताेडून धूम ठाेकली. मंगळवारी सकाळी सिन्नर तालुक्यात हा थरार अनुभवास मिळाला.

नाशिक- पुणे रस्त्यावरील चिंचाेली गावच्या पूर्वेला भक्ष्याच्या शाेधात अालेला बिबट्या साेमवारी रात्री एका शेतातील विहिरीत पडला. ४० फूट खाेलीच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याने रात्रभर एका कपारीचा अाधार घेेतला. मात्र, मंगळवारचा दिवस उजाडल्यावर त्याच्या डरकाळ्यांनी परिसरात घबराट निर्माण झाली. अाजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्याला पाहण्यासाठी विहिरीकडे धाव घेतली. वनविभागचे पथकही सकाळी ९.३० वाजता घटनास्थळी अाले त्यांनी बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विहिरीत दाेरीच्या साह्याने जाळी साेडण्यात अाली. ट्रॅक्विलायझर गनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध करायचे नंतर जाळीत अडकवून वर घ्यायचे अाणि जंगलात साेडायचे, असे नियाेजन वनविभागाने केले हाेते. वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात केली. लांब काठीला लावलेल्या अमिषाच्या सहाय्याने या बिबट्याला जाळीत येण्यास भाग पाडण्यात अाले. त्याने पाय टाकताच गुंडाळून घेतलेल्या जाळीतून त्यास वरती काढण्यात येवू लागले. मात्र, भांबावलेला बिबट्या बाहेर पडण्याची धडपड करत हाेता. त्यातच लाेकांचा अारडाअाेरडा सुरू असल्याने बिबट्या अधिकच बिथरला. त्याला विहिरीच्या कठड्यापासून वर घेताना गनमॅनने त्याच्या दिशेने ट्रॅक्विलयझर गनने नेम धरला, मात्र ताे चुकला. ही संधी साधून क्षणार्धात पंजा अाणि दाताच्या साह्याने बिबट्याने अापली सुटका करुन घेतली. त्यामुळे वन विभागाने विहिरीबाहेर लावलेल्या पिंजऱ्यात अडकण्याएेवजी बिबट्या लांब धापा टाकत दूरवर शेतातून निघून गेला.