नाशिक - शिक्षणशास्त्र परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आदर्श शिक्षक घडण्यासाठी अध्ययन अध्यापनातील बदल आत्मसात करून शिक्षण दिले पाहिजे. आदर्श पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, स्पर्धेला ध्येयाने सामोरे गेले तर हमखास यश मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भूषण कर्डिले यांनी केले.
के. के. वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दोन दिवसीय बीए सीईटी मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी डॉ. कर्डिले बोलत होते. ते म्हणाले की, शिक्षकांना विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून अध्यापन केल्यास चांगले विद्यार्थी घडू शकतील. बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. सीईटी परीक्षेचे स्वरूप अाणि रचना यावेळी कर्डिले यांनी समजावून सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. योगिता भामरे यांनी केले.
भावी शिक्षकांनी बीएड अभ्यासक्रम पूर्ण करताना अध्ययन अध्यापनातील बदलते प्रवाह समजून घेऊन प्रशिक्षण घेतल्यास त्याचा भविष्यात माेठा फायदा होतो, असे यावेळी भामरे यांनी नमूद केले.
या कार्यशाळेसाठी प्रा. किर्ती चित्ते, दीपाली सूर्यवंशी, प्रा. प्रतिभा जाधव, जयश्री वाघमारे, स्नेहा गायकवाड, सुवर्णा देसले, सोमनाथ गाजरे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी जाणून घेतले परीक्षेचे स्वरूप..
प्रा.उषा क्षत्रिय यांनी १३ व १४ रोजी होणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. सीईटी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असेल. परीक्षेसाठी मानसिक क्षमता, जनरल नॉलेज, शिक्षक अभियोग्यता हे तीन प्रमुख विषय असतील. प्रत्येक प्रश्न सोडवताना कोणती दक्षता घ्यायला हवी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. सुवर्णा बत्तासे यांनीही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचे धडे उपस्थितांना दिले.