आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील बंद पथदीप अखेर पुन्हा झळाळणार, एलईडीचा वाद सारला बाजूला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात पथदीपांवर एलईडी फिटिंग लावण्याचे नियोजन असल्याने जुन्या फिटिंग लावण्यास महापालिका प्रशासनाने मज्जाव केला हाेता. त्यामुळे एलईडीच्या प्रतीक्षेत शहरातील बहुतांश पथदीप बंद अवस्थेतच अाहेत. परिणामत: रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. याबाबत शहरवासीयांकडून माेठी अाेरड झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग अाली असून, पथदीपांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन काेटींच्या निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून अंधारात असलेल्या उपनगरांतील रस्ते पुन्हा एकदा झळाळणार आ‍हेत.

शहरात एलईडी पथदीप बसविण्याचे प्रकरण दाेन वर्षांपासून गाजत आहे. हे प्रकरण न्यायालयातही गेले. न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर या कामाचा मार्ग खुला झाला. ऑगस्टच्या प्रारंभी पथदीप बसविण्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही महिने उलटूनही हे काम सुरू झाले नाही. शहरातील अनेक पथदीप बंद असून, त्यामुळे संबंधित ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या बंद दिव्यांच्या जागी नवीन दिवे लावले अाणि त्यानंतर लगेचच एलईडी बसविण्याचा निर्णय झाल्यास अाधीचा खर्च वाया जाईल, या विचाराने बंद पथदीप दुरुस्त करण्याची भूमिका प्रशासनाने गेल्या वर्षापासून घेतली हाेती. परंतु, त्यामुळे अंधाराचा फायदा उचलत शहरात चाेऱ्यांचे प्रमाण वाढले हाेते. स्त्रियांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला हाेता. त्यामुळे स्वाभाविकपणे नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त हाेत हाेता. अखेर जनक्षाेभापुढे नमते घेत, प्रशासनाने बंद पथदीपांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले अाहे. या निर्णयामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या पथदीप अखेर सुरू होण्याची नाशिककरांना अपेक्षा आहे.

'दिव्य मराठी'चा पाठपुरावा-
नागरीप्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध हाेण्याच्या हेतूने "दिव्य मराठी'तर्फे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये घेण्यात येणाऱ्या ‘विकास मंच’ अभियानातही बंद पथदीपांचा प्रश्न वारंवार उपस्थित झाला अाहे. रस्त्यांवर काेणत्या प्रकारचे दिवे लावावेत यात अाम्हाला स्वारस्य नाही, परंतु अामच्या रस्त्यांवर प्रकाश पडू द्या’ एवढीच अपेक्षा नागरिकांकडून वर्तविण्यात येत हाेती. या पार्श्वभूमीवर बंद पथदीप सुरू व्हावेत, यासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीनेही पालिकेचे पदाधिकारी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात अाला.

साहित्याची तातडीने हाेणार खरेदी-
शहरातीलबंद पथदीपांबाबत काही महिन्यांपासून अाेरड हाेत अाहे. एलईडीचा निर्णय व्हायचा तेव्हा हाेईल. परंतु, दरम्यानच्या काळात नागरिक वेठीस धरले जाऊ नये, म्हणून तीन काेटींचे साहित्य खरेदी करण्यात येणार अाहे. तशी निविदा काढण्याचेही ठरले अाहे. यामध्ये बंद पथदीपांच्या दुरुस्तीचे काम हाेणार अाहे. अावश्यक ती कामे प्राधान्याने करण्यात येतील. -अशाेक मुर्तडक, महापाैर